आरोप खोटे, ‘काकां’कडून पुतण्याची पाठराखण

April 18, 2014 7:05 PM1 commentViews: 5505

474_ajit_pawar_sharad_pawar18 एप्रिल : “सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाहीतर गावचं पाणी बंद करू” अशी धमकी देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आता त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठराखण केली आहे.

अजित पवारांच्या दमदाटीबाबत शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता पवार चांगलेच भडकले. अजित पवारांवर आरोप खोटे आहेत अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही अजित पवारांची पाठराखण केली. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं याची दखल घेतली असून अजित पवारांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि पुणे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागावला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी राज्यात पुन्हा एकदा ‘दादा’ बॉम्ब फुटला. नेहमी आपल्या शिवराळ वक्यव्यामुळे प्रसिद्ध असलेले अजित पवार एका व्हिडिओ टेपमुळे चांगलेच अडचणीत आले. या व्हिडिओत अजित पवार बारामती मतदारसंघातल्या मासाळवाडीच्या गावकर्‍यांना, “सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर, गावचं पाणी बंद करू”, असं अजित पवार बोलत असल्याचं दिसून येतंय. याबाबत आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण, याबाबत पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही.

अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या अगोदर अजित पवारांनी ‘धरणात पाणी नाही तर मुतायचं का तिथे’ असं व्यक्तव्य करून जनतेचा रोष ओढावून घेतला होता. मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादीने अजित पवारांची पाठराखण केलीय. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना अजितदादांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली असता शरद पवार प्रतिनिधींवर चांगलेच चिडले. अजित पवारांवर आरोप खोटे आहेत असं सांगून पुढे बोलण्याचं त्यांनी टाळलं. पण प्रतिनिधींनी खोपडे आणि जानकर यांनी अजितदादांच्या विरोधात तक्रार केलीय असा सवाल विचारला असता पवार प्रतिनिधींवरच आणखी भडकले. तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळते ना ? असं चिडून उत्तर देऊन पवारांवर खोटे आरोप केले जात असल्याचं सांगितलं.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही अजित पवारांची पाठराखण केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. अजित पवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ बनावट आहे. त्यांच्या आवाज कुणी तरी डब केला असं मलिक यांनी सांगितलं. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं याची दखल घेतली असून अजित पवारांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि पुणे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागावला आहे.

काय म्हणाले अजित पवार

“उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन. पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला तर इथलं पाणी सगळं मी बंद करेन. मी तुम्हाला आताच सांगतो..जर मासाळवाडी किंवा कुणी..तर मला मशीनमध्ये दिसेल, मी सरळ त्या लोकांना सांगेन की जर तुम्हाला अशी मस्ती आली तर मला तरी काय घेणं देणं आहे? शेवटी एका गावावरून माझी बहीण पडायची राहत नाही किंवा निवडून यायची राहत नाही.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sajay

    himmat hai marda to madat hai khuda

close