22 शेतकर्‍यांच्या आत्महत्या,निधीही लालफितीत अडकला !

April 18, 2014 7:02 PM0 commentsViews: 379

सतीश पाटील, जळगाव

18 एप्रिल : एकीकडे राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात गारपिटीमुळे 3 आठवड्यांत 22 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगाम तरी चांगला येईल ही त्यांची अपेक्षा होती. पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला. गारपिटीमुळे गहू, हरभरा, मका यासोबतच फळबागाही उद्धवस्त झाल्या आहेत. आता घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हाच बळीराजासमोरचा मुख्य प्रश्न आहे. सरकारनं मदत जाहीर केली.पण अजूनही ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. त्यामुळे निराश होऊन, खचून अनेक शेतकर्‍यांनी आपलं आयुष्यचं संपवलंय.

ज्यांचं नुकसान 50 टक्क्यांपेक्षाही जास्त झालंय, त्याच शेतकर्‍यांसाठी सरकारनं मदत जाहीर केली. त्यामुळे ज्यांचं 50 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालंय. त्यांना आता पुढे काय ? हा प्रश्न आहेच. तर जी मदत जाहीर केली गेली. तीही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीए. कारण शेतकर्‍यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खातं नाही आणि जिल्हा बँकेला ऑनलाईन सुविधा नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडत नाहीये.

निवडणुकांच्या धामधुमीत, आचारसंहितेच्या बडग्यात आणि लालफितीच्या कारभारात या शेतकर्‍यांची मदत अडकलीये. मदतीचे पैसे मिळत नाही. पण बँका कर्ज वसुलीसाठी तगादा लावतायेत आणि वीज वितरण कंपन्या वीज तोडण्याची धमकी देत आहेत. पण निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भरघोस आश्वासनं देत फिरताना आपल्या नेत्यांना या शेतकर्‍यांकडे बघायला वेळ कुठे आहे?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close