शरद पवारांची तिसर्‍या आघाडीशी जवळीक : काँग्रेसमध्ये अस्वस्थता

April 2, 2009 5:50 AM0 commentsViews: 7

2 एप्रिल, दिल्लीआशिष दीक्षित येत्या शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये होणार्‍या तिसर्‍या आघाडीच्या सभेला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या या नव्या गुगलीमुळे काँग्रेसप्रणीत युपीए सध्या अडचणीत आलेली दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं शीतयुद्ध संपलंय की काय असं वाटत असताना पवारांच्या या भूमिकेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आम्ही काही काँग्रेसचे वेठबिगार नाही असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. जेव्हा आम्ही निवडणुकीची स्वतंत्र रणनिती आखतो तेव्हा आम्ही काँग्रेस सोबत आहोत की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. आम्ही काँग्रेसचा सहाय्यक पक्ष आहोत. आम्हालाही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे पर्यायाने आमचीही एकप्रकारची स्वतंत्र रणनीती आहे. आम्ही काही काँग्रेसचे वेठबिगार नाही, ' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध हे मैत्रीचे कमी आणि शत्रुत्वाचे जास्त आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात या दोन्ही पक्षांची दोन्ही आघाडी झाली असली तरी देशातल्या कित्येक राज्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ओरिसामध्ये राष्ट्रवादीनं बिजू जनता दल आणि कम्युनिस्टांसोबत आघाडी केली असून पवार स्वत: भुवनेश्वरमध्ये होणार्‍या संयुक्त प्रचारसभेला हजेरी लावणार आहेत. यामुळं काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. 'आता कोणती भूमिका घ्यायची हे परिस्थितीवर अवलंबून राहील. तिसरी आघाडी जरी कितीही मोठी असली तरी ती शंभरवर सीट्स आणू शकेल असं आम्हाला वाटत नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. __PAGEBREAK__मात्र राष्ट्रवादी या परिस्थितीसाठी काँग्रेसला जबाबदार धरत आहे. 'आम्हाला तिसर्‍या आघाडीतल्या पक्षांसोबत जाण्यासाठी काँग्रेसनंच भाग पाडलं, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. जी. त्रिपाठी यांनी केला आहे. ' युपीएच्या तत्त्वार निवडणूक लढा आणि राष्ट्रीयपातळीवर युती करा असं आम्ही काँग्रेसला सांगितलं होतं. पण दुदैर्वानं ते काँग्रेसनं मानलं नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या निवडणुकीची स्वतंत्र रणनिती बनवायला तयार आहोत. ' असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. मनमोहनसिंग हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदावर आहेत आणि युपीएचे नाहीत या विधानामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले मतभेद उघड झाले आहेत आणि आता तर पवारांच्या भुवनेश्वरमधल्या सभेमुळे या दोन्ही पक्षांमधली दरी आणखीनंच वाढणार आहे. जाणकारांच्या मते निवडणुकीनंतरच्या समीकरणांचा विचार करून पवार सगळे मार्ग खुले ठेवू इच्छितात. म्हणून त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यात काँग्रेससोबत तर इतर काही राज्यांमध्ये तिसर्‍या आघाडीसोबत जवळीक वाढवली आहे.

close