मराठी तरुणांचा घास हिरावला तर परत मारीन-राज ठाकरे

April 21, 2014 11:05 PM0 commentsViews: 10453

89raj_thackarey_mns21 एप्रिल :मराठी तरुणाचा घास हिरवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यांना परत मारीन अशी ‘खळ्ळ खट्याक’ धमकी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना दिलीय. तसंच उत्तर भारतीयांचं ओझं महाराष्ट्र सहन करणार नाही. याबद्दल मी बोलतच राहिनं, जरी माझ्यावर खटले दाखल केले तर त्याची मला पर्वा नाही असंही राज म्हणाले. मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी लालबाग इथं घेण्यात आलेल्या प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांना टार्गेट करत मनसे ‘स्टाईल’ने इशारा दिलाय. अलीकडेच अनेक राष्ट्रीय चॅनलच्या संपादकांनी माझी मुलाखत घेतली. मला नेहमीप्रमाणे हाच प्रश्न विचारला गेला तुम्ही परप्रांतीयांना का मारता ? का मारतात म्हणजे ? आपलं राज्य सोडून दुसर्‍या राज्यावर ओझं व्हायचं आणि इथं येऊन आमच्या मराठी तरूणांचा घास हिरावून घ्यायचा हे खपवून घेणार नाही. जर मराठी तरुणांच्या नोकर्‍या हिसकावून घेतल्या जात असतील तर त्यांना परत मारीन असा इशारा राज यांनी दिला.

दररोज रेल्वेनं भरभरून परप्रांतीय मुंबईत येतात. इथं येऊन नोकर्‍या मिळवता पण यामुळे आमचे मराठी तरूण बेकार राहतात. हे परप्रांतीय लोंढे इतर राज्यात का जात नाही ? आणि जर गेली तरी तिथे त्यांना लाथाडून काढतात मग आम्ही त्यांचं ओझं का सहन करायचं ? ही मुंबई मराठी माणसांची आहे. आम्ही अगोदरही यासाठी रस्त्यावर उतरलो आता ही उतरू पण मराठी माणसाला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे असंही राज म्हणाले. अस्मितेचा डोस फक्त आम्हाला पाजू नये ते इतरांनाही पाजा असंही राज म्हणाले. तसंच मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या घोळाबद्दल राज यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मतदार यांद्यामध्ये घोळ होण्यास काँग्रेसच राजकारणाच जबाबदार आहे असा आरोपही राज यांनी केला. राज यांनी परप्रांतीयांविरोधात जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close