बारामतीत 22 गावं, 40 वर्षांपासून तहानलेली !

April 23, 2014 10:22 AM0 commentsViews: 1531

मच्छिंद्र टिंगरे, बारामती
23 एप्रिल : निवडणुकीत बारामतीमधल्या 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला. या प्रकरणी अजित पवार अडचणीत आल्याने आता विरोधकही या मुद्यांचा पुरेपूर वापर करून घेताना दिसतायत. गावकर्‍यांची मात्र पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.

लोणी, भापकार, मूढाळ, ढाकळे. अशी एक-दोन नाही तर तब्बल 22 गावं. गेली 40 वर्षं तहानलेली आहेत. साठवून ठेवलेलं पाणी, टँकर्स असं दृश्य इथे सर्रास पाहायला मिळतं. आश्वासनांवर विश्वास ठेवत हे गावकरी मतदानही करतात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इथे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे असं सांगण्यात येतंय. रस्त्यात पडलेले पाण्याचे पाईप्सही दिसतात. पण पाणी कधी मिळणार याची खात्री कोणीच देत नाही. त्यामुळेच गावकर्‍यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

अजित पवारांच्या या धमकी प्रकरणामुळे निवडणुकीच्या काळात विरोधकांना आयताच एक मुद्दा मिळालाय.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समर्थक पुरंदर उपसा जलसिंचनामुळे पाणी मिळत असल्याचं सांगत विरोधक उगाच राजकारण करत असल्याचा दावा करतायत.

मतदानाला पाणीप्रश्नाचा फटका बसू नये म्हणून अजित पवारांनी आचारसंहिता संपल्यानंतर या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलं. पण गेली 40 वर्षं केवळ आश्वासनं मिळालंय. गावकर्‍यांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. आता ही आचारसंहिता संपल्यानंतर सत्ताधारी किंवा विरोधकांनी याचं केवळ मत मिळवण्यापुरतं राजकारण न करता या प्रश्नाची तातडीने तड लावावी एवढीच स्थानिकांची अपेक्षा आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close