मोदींपेक्षा केजरीवाल भारी, लोकप्रियतेत पटकावला नंबर 1 !

April 25, 2014 10:22 PM1 commentViews: 2764

Modi kejri25 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात नमो अर्थात नरेंद्र मोदी विरुद्ध रागा म्हणजे राहुल गांधी आणि नमो विरुद्ध ऐके म्हणजे अरविंद केजरीवाल अशी लढाई पाहण्यास मिळत आहे. पण लोकप्रियतेच्या बाबतीत अरविंद केजरीवाल यांनी बाजी मारली आहे.

 

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी टाईम मॅगझिनच्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावलंय. त्यानंतर दुसर्‍या स्थानावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना वाचकांनी पसंती दिलीय.

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे केटी पेरी, जस्टीन बायबर या सेलिब्रिटींना मागे टाकून या दोघांनी आघाडी घेतलीय. वाचकांनी आधी केटी पेरी आणि जस्टीन बायबर यांना पसंती दिली होती पण ठिकठिकाणी मतदान झालं आणि बाजी पलटली. आपचे नेते केजरीवाल यांना तब्बल 2 लाख 61 हजार वाचकांनी पसंती दाखवली. तर मोदींना 1 लाख 64 हजार वाचकांची पसंती मिळाली. पण त्यांना 1 लाख 66 हजार वाचकांची नापसंतीही मिळाली. आणि काँग्रेसचे उपाध्य राहुल गांधी या यादीत तब्बल 39 व्या क्रमांकावर फेकले गेले.

अरविंद केजरीवाल हे राजकारणात येण्याअगोदर एक महसूल खात्यातले अधिकारी होते. त्यानंतर इंडिया अगेन्सट करप्शन या संस्थेतून त्यांनी सामाजिक कार्याचा विडा उचलला. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत जनआंदोलनातही उतरले. लोकपाल विधेयकासाठी तब्बल तीन वर्ष हे जनआंदोलन सुरू होतं. या आंदोलनाच्या मध्यात केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आणि आंदोलनातून बाहेर पडले. आणि आम आदमी पार्टी असा पक्ष स्थापन केला.

केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आप पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवली. आणि 15 वर्ष सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचलं. ‘आप’ला पहिल्याच निवडणुकीत 28 जागा मिळाल्यात. बहुमताच्या मोठ्या पेचानंतर केजरीवाल यांनी सत्ता स्थापन केली. आणि दिल्लीचा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान पटकावला. पण हा मान जास्त दिवस टिकला नाही.

49 दिवसांतच केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यानंतर केजरीवाल यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतलीय. केजरीवाल हे वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आता टाईमच्या मासिकात केजरीवाल यांनी बाजी मारली असली तरी वाराणसीच्या आखाड्यात कशी रंगत येणार हे पाहण्याचं ठरेल.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sanjay

    this news is only here i guess

close