अमेरिकेतील हल्ल्यात बैतुल्ला मेहसूदचा हात

April 4, 2009 11:14 AM0 commentsViews: 2

4 एप्रिल, न्यूयॉर्कन्यूयॉर्कमधल्या बिंगहॅम्प्टनमध्ये काल शुक्रवारी सकाळी 10.30 ला झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तालिबानच्या बैतुला मेहसूदनं स्वीकारलीये. एका न्यूज एजन्सीला फोन करून, तेहरिक-ए-तालिबानच्या माध्यमातून हा हल्ला आपणच घडवून आणला, असं म्हटलं आहे. न्यूयॉर्कमधल्या बिंगहॅम्प्टन पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हल्ला प्रकरणातील बंदुकधारी हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्या 42 वर्षांच्या व्हिएतनामी वंशाच्या हल्लेखोराचं नाव जिव्हर्ली वाँग आहे. वाँगला आपली नोकरी गमवावी लागली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच वाँगने अमानुषपणे गोळीबार करून 14 जणांना ठार केलं आहे.न्यूयॉर्कच्या बिंगहॅम्पटनमध्ये अमेरिकन सिव्हिक असोसिएशनमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 14 जण ठार झालेत. या चौदा जणांमध्ये गोळीबार करणा-या जिव्हर्ली वाँग या हल्लेखोराचाही समावेश आहे. या हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं बिंगहॅम्पटन पोलिसांनी सांगितलं आहे. हल्लेखोर जिव्हर्ली वाँग स्वत:ची कारबरोबर घेऊन आला होता. त्याने कारसह असोसिएशनच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेदहाची ही घटना आहे.त्यानंतर त्याने तिथे असलेल्या दोन्ही रिसेप्शनिस्टना गोळ्या घातल्या. मग जिव्हर्लीने अमेरिकन सिव्हिक असोसिएशनमधल्या वर्गांकडे आपला मोर्चा वळवल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान ओलीस ठेवलेल्या सगळ्या लोकांची सुटका करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना पकडून नेल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. बिगहॅम्प्टन शहर न्यूयॉर्कपासून 140 मैल दूर आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध केला आहे.अमेरिकन सिव्हिक असोसिएशन ही संघटना स्थलांतरित आणि निर्वासित यांचं पुनर्वसन तसंच समुपदेशन करण्याचं काम करते. त्याचप्रमाणे स्थलांतरितांना अमेरिकेचं नागरिकत्त्व मिळावं यासाठी असोसिएशनच्यावतीने सल्ला आणि मदत देण्यात येते. स्थालांतरितांची कामं अडू नयेत यासाठी त्यांना दुभाषाही दिला जातो.

close