ज्येष्ठ तमाशा कलावंत ‘बाळू’ काळाच्या पडद्याआड

April 26, 2014 3:26 PM1 commentViews: 3802

kalu balu tamasha26 एप्रिल : ज्येष्ठ तमाशा कलावंत ‘बाळू’ उर्फ अंकुश खाडे यांचं निधन झालं. अंकुश खाडे उर्फ बाळू यांचं मिरजमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव सांगलीच्या कवलापूर इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

 काळू-बाळू ही जोडी तमाशा जगतात लोकप्रिय होती. काळू-बाळू या जोडीनं ग्रामीण भागात तमाशाचा प्रसार केला. तमाशाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केलं. गेली साठ वर्षे तमाशाच्या माध्यमातून त्यांनी आपली कला सादर केली. या क्षेत्रात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. काळू-बाळू या जुळ्या भावांनी एकाच वेळी संवाद उच्चारण्याची कला अवगत केली होती. त्यांचा ‘जहरी प्याला’ अर्थात काळू-बाळू हे वगनाट्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं.

काळू-बाळूंचा जीवनपट

काळू-बाळू ही जोडी अनेक खेड्यापाड्यात प्रचंड लोकप्रिय अशी अभिनय संपन्न जोडी. तमाशा कलावंतामध्ये काळू-बाळू यांचं नाव अग्रस्थानी नावं आवर्जून घेतली जात. विशेष म्हणजे काळू आणि बाळू ही जुळी भावंडं त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी पैजा लावल्या जात.काळू यांचं नाव लहू तर बाळू यांचं नाव अंकुश पण आडनाव खाडे तरी कवलापूरकर नावानेचे ते प्रसिद्ध होते. खाडे घरात तमाशाचं वातावरण होतं असल्यामुळे काळू-बाळूंना तमाशाचं बालकडू घरीच मिळालं. त्यांचे आजोबा, चुलते आणि भावंडं तमाशात काम करत. त्यामुळे अंकुश यांना लहानपणापासून तमाशात काम करण्याची संधी मिळाली. काळू-बाळूंचे दिसणं, बोलणं आणि वागणं सारखंच होतं. काळू-बाळू जेव्हा एकत्र स्टेजवर येत तेव्हा प्रेक्षक अक्षरश: तंबू डोक्यावर घेत.

 

बाबूराव पुणेकर यांच्या ‘जहरी प्याला’ वगनाट्यात ‘काळू-बाळू’ची मोठी भूमिका साकारली होती. ‘जहरी प्याला’च्या प्रयोगानंतर काळू-बाळू जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. जहरी प्याला म्हणजे ‘हॅम्लेट’ आणि ‘मॅकबेथ’चं देशी रूप असंच मानलं जायाचं. काळू-बाळू सोंगाड्याचीही भूमिका निभावत असत. त्यांनी राजकीय, सामाजिक घटना-घडामोडींवर ही सोंगाड्यांची भूमिका साकारून मार्मिक भाष्य केलं. पण या सगळ्यात काळू-बाळूंनी निभावलेली हवालदाराची भूमिका खूपच गाजली. काळू यांनी 60 वर्षाच्या कार्यकाळात एकही सुटी घेतली नाही, बाळू यांचे प्रयोग मात्र आजारपणामुळे थांबले. काळू-बाळूंचा अखेरचा प्रयोग हा आपल्या जन्मभूमी कवलापूरच्या स्थानिक जत्रेत झाला. त्यानंतर दुर्देवाने या जोडीतला एक तारा 7 जुलै 2011 ला निखळला. काळू यांचं आजारपणामुळे 7 जुलैला निधन झालं. गेली साठ वर्ष तमाशाच्या स्टेजवर एकमेकांना साथ देणारे बाळू यांनी आज अखेरचा निरोप घेतला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • jaydeep pachpute

    Kalu balu yancha tamasha aaj vasuli , tal-khed, dist – pune. Yethe honar aahe. Balu yanchya nidhanachi batmi akun maharashtravar shok kala pasarali aahe.

close