‘नॅशनल’ चिखलफेक, ममतादीदी म्हणाल्या मोदी सैतान !

April 28, 2014 10:55 PM0 commentsViews: 934

modi and mamata28 एप्रिल : लोकसभेच्या सातव्या टप्प्याचा प्रचार आज (सोमवारी) संपला. एकीकडे प्रचाराचा धुराळा थंडावत असताना राजकीय नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत विखारी आरोप-प्रत्यारोप केलेत. भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा यांच्यावर निशाणा साधत ‘दामादगेट घोटाळा’ जाहीर केला.

भाजप नेत्यांनी एक व्हिडिओ क्लीप दाखवत रॉबर्ट वडरा यांच्यावर पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याचा आरोप केला. याला उत्तर म्हणून काँग्रेसनं आज पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांचा हवाला ऑपरेशटरशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला.

हवालाचा ऑपरेटर अफरोझ फट्टा याच्याशी मोदींचा संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसने फट्टा आणि मोदी यांचे फोटोही प्रसिद्ध केले. 700 कोटींचा हा हवाला रॅकेट आहे आणि या व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात असल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. दुसरीकडे भाजपनंही या आरोपाला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी ट्विटरवर एक फोटो टाकलाय. हवाला ऑपरेटर अफरोज फट्टाचा काँग्रेसचे खासदार अझरुद्दीन यांच्याबरोबरचा हा फोटो आहे.

ममतादीदी भडकल्या म्हणाल्या, मोदी सैतान !

तर पश्चिम बंगालमध्येसुद्धा मोदी विरुद्ध तृणमूल काँग्रेस असं वाक्‌युद्ध रंगलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत मोदींनी ममतांना लक्ष्य केलं. त्यांच्यावर शारदा चिट फंड घोटाळ्याचा आणि स्वत: काढलेल्या पेंटिंग्ज कोट्यवधी रुपयांना विकल्याचा आरोप केला. यामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी मोदींना थेट सैतानाचीच उपमा दिली. त्यांच्याच पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर मोदींचा ‘कसाई’ असा उल्लेख केला. तसंच ममतांचं एक पेंटिंग 1 कोटी 80 लाख रुपयांना विकल्या गेल्याचा आरोप मोदींनी सिद्ध करून दाखवावा नाहीतर माफी मागावी, अशी मागणी खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली.

स्वतःचं तोंड आरशात पाहा,मोदी कडाडले

तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आणि नरेंद्र मोदी यांच्यातलाही वाद आता पेटलाय. मोदींना मत देणार्‍यांनी समुद्रात बुडून जावं, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. त्यांना मोदींनी प्रत्यत्तुर दिलंय. काश्मीरमधून पंडितांना अब्दुल्ला घराण्यानंच बाहेर काढलं, असा आरोप मोदींनी केलाय. फक्त राजकारणासाठी अब्दुल्ला घराण्याने इथे धर्मांधता रुजवली असंही त्यांनी म्हटलंय. या घराण्यानेच धर्मनिरपेक्षतेला मोठा धोका निर्माण केला. त्यामुळे भाजपला मतं देणार्‍यांना समुद्रात बुडण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांनीच आरशात स्वतःचं तोंड पाहावं असा टोलाही मोदींनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close