सेनेचा ‘बाण’ मागे, मराठी-गुजराती एकजूट टिकवू या !

May 2, 2014 6:40 PM0 commentsViews: 1479

udhav thakare on modi02 मे : ‘महाराष्ट्रात राहुन पैसा कमवणारे हे ‘बेपारी’ महाराष्ट्र दिनाच्या जन्मोत्सवात का सामिल होत नाहीत ?’ असा सवाल विचारणार्‍या शिवसेनेनं आता यु-टर्न घेतलाय. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं महाराष्ट्र दिनी गुजराती समाजावर ‘बाण’ सोडला होता आता तो मागे घेतले आहे. गुजराती समाज आणि मराठी माणसाची एकजूट अशीच टिकवून ठेवूया, येणार्‍या सर्व निवडणुकांतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा हा चमत्कार प्रत्यक्षात घडवून दाखवूया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूया असं आवाहनच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाज बांधवांना केलं आहे. सेनेनं एक प्रसिद्ध पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती समाजाला टार्गेट केलं होतं. शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून गुजराती व्यापार्‍यांवर टीका केली होती. “महाराष्ट्रासाठी झालेल्या बलिदानावर श्रद्धा असलेला सामान्य मराठी माणूस आजच्या दिवशी हुतात्म्यांचे स्मरण करेल. पण मलबार हिल, वाळकेश्वर, कफ परेड, कुलाबा, जुहू भागात राहणारे धनवान लोक महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात कधीच सहभागी झाले नाहीत अशी तोफ सेनेनं डागली होती.

तसंच मुंबईत राहून त्यांनी सत्तासंपत्तीचा भोग घेतला. त्यांनी महाराष्ट्राला शोषून स्वतःच्या सोन्याच्या द्वारका उभ्या केल्या आणि मुंबईतल्या पैशाच्या जोरावर हे सर्व उद्योगपती देशातल्या सत्तेचा सारीपाट मांडून बसले आहेत. कुणाला पंतप्रधान बनवायचे आणि कुणाला खेचायचे याचे आडाखे ठरत आहेत. एरवी ‘आमचा राजकारणाशी संबंध नाही, आम्ही बरे की आमचा बेपार’ असे बोलणारे हे सर्व ‘बेपारी’ आज आपल्या मातीचा आणि जातीचा पंतप्रधान व्हावा यासाठी प्रांतीय वज्रमूठ घेऊन एकत्र आलेच ना? पण महाराष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी यापैकी किती ‘बेपारी’ महाराष्ट्र दिनी आपल्या उंची इमल्यांतून खाली उतरुन महाराष्ट्र दिनाच्या जन्मोत्सवात सामील झाले का ? असा सवालही उपस्थित केला. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात अशा भूमिकेमुळे सेनेनं सोडलेला बाण परत मागे घेतलाय. सेनेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुजराती समाजाबद्दल गोडवे गात एकजुटीचं आवाहन केलंय.

सेनेचं प्रसिद्ध पत्रक

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात खंबीर सरकार यावं म्हणून महाराष्ट्रात सर्वांनी एकजुटीने मतदान केले आहे. विशेषत:मराठी आणि गुजराती या हिंदू आणि कडवट हिंदूत्व मानणार्‍या बांधव भगिनींनी तर कमालच केली आहे. त्यांची ही एकजूट पाहून अनेकांच्या पोटात मुरडा आला आहे. “बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, मुंबईतील मराठी आणि गुजराती बांधव पूर्ण ताकदीने एकत्र आले तर देशात चमत्कार घडवू शकेल.” जणू या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात या चमत्काराची सुरुवात पाहायला मिळणार आहे. अभी आगे आगे देखो होता है क्या”, आता मराठी, गुजराती समाजाची ही एकजूट तुटणार नाही, फुटणार नाही. आपले दोन समाज एकत्र आल्यामुळे आता आपले काय होणार या भीतीने काही रिकामटेकडे या गोड संबंधात बिब्बा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांपासून सावध राहुया आणि ही एकजूट अशीच टिकवून ठेवूया, येणार्‍या सर्व निवडणुकांतून शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असणारा हा चमत्कार प्रत्यक्षात घडवून दाखवुया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूया.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close