माध्यमांनीच सामनाच्या अग्रलेखाचा विपर्यास केला – आदित्य ठाकरेंचा दावा

May 4, 2014 3:06 PM0 commentsViews: 2291

Aaditya_Thackeray04 मे :  महाराष्ट्रदिनी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचे पडसाद अजूनही उमटले आहेत. ‘महाराष्ट्राच्या जन्मोत्सवात कोण- कोण सामील होणार?’ या अग्रलेखामुळे मराठी आणि गुजराती असा नवा वाद निर्माण झाला. मात्र युवा-सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माध्यमांनीच अग्रलेखाचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे.

मराठी आणि गुजराती समाजानं महाराष्ट्राला आपलं मानलं आणि राज्याच्या विकासासाठी एकजूट केली तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ कोणीच रोखू शकणार नाही, असा त्या अग्रलेखाचा अर्थ असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. अग्रलेखातून कुणावरही हल्ला चढवलेला नाही, तर दोन्ही समाजाची ‘महाराष्ट्र’ म्हणून एकच ओळख असावी असा ट्विट आदित्य ठाकरेंनी केला.

इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील गुजराती समाज आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा होता, आणि तेच प्रेम आता मला आणि उद्धव ठाकरेंना मिळतंय असाही दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. शिवसेना अनेक अडचणींमध्ये गुजरातच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. मग तो भूजचा भूकंप असो की नर्मदा प्रकल्प प्रत्येक वेळी शिवसेनेनं मदत केल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. एकूणच शिवसेनेला मोदींविषयी आकर्षण असलेल्या गुजराती मतदारांना गमवायचं नाहीए असं दिसतं आहे.

आदित्य ठाकरेंचं ट्विट

काही माध्यमांनी सामनाच्या अग्रलेखाचा पूर्णपणे विपर्यास केलाय. मराठी आणि गुजराती समाज एकत्र आला तर महाराष्ट्र आणि या दोन्ही समुदायांच्या प्रगतीला कोणीच थांबवू शकत नाही असा त्याचा साधा अर्थ होता. त्यामध्ये कोणालाही फटकारण्यात आलं नाही. उलट दोन्ही समुदायांनी मुंबई ही एकच जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचं लक्षात घ्यावं अशी कळकळीची विनंती त्यात करण्यात आली होती. गुजराती समाज हा नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि माझ्या पाठीशी उभा राहिलाय. आणि आम्हीही भूजमधल्या भूकंपासारख्या संकटाच्या वेळी गुजरातच्या पाठिशी उभं राहिलो आहोत.
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close