आसाममध्ये 4 बॉम्बस्फोट : 7 ठार, 32 जखमी

April 6, 2009 3:13 PM0 commentsViews: 8

6एप्रिल, गुवाहटी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आसाम दौ-याच्या एक दिवस आधी आज सोमावारी राज्यात चार महाभयंकर बॉम्बस्फोट झाले. मालीगांव (गुवाहटी), धेकीयाजुली (तेजपूर), मेन्काचार (दुबारी), उदलगुरी (दरँग) ही ती चार ठिकाणं आहेत. ही चारही ठिकाणं असाममधली गजबलेली ठिकाणं आहेत. दुपारी एकच्या दरम्यान हे चार स्फोट झाले आहेत. या 4 स्फोटांत 7 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हे चारी स्फोट मोटारसायकलमध्ये स्फोटकं ठेवल्याने झाले असल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली आहे. मालीगांवमधल्या स्फोटांत एका शाळेकरीमुलगा जबदस्त जखमी झाला आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. त्याची नावं मौसुम खातून आणि भुपेन कुमार आहेत. या स्फोटांचा आसाममधल्या सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. स्फोटांमुळे गुवाहटी आणि आसपासच्या परिसरांत वाहतुक ठप्प झाली होती. स्फोटांतल्या जखमींना संजिवनी हॉस्पिटल, नॉर्थ इस्ट फ्रन्टायर रेल्वे हेडक्वॉटर हॉस्पिटल, गोवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. स्फोटांमागे युनायटेड लिबरेशन फ्रन्ट ऑफ आसाम म्हणजेच उल्फाचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा या स्फोटांमुळे सतत होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आसामच्या गृहखात्याने आणि संरक्षण दलानं संपूर्ण राज्याला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

close