मराठी पंतप्रधानपद ही मूळ कल्पना आपलीच – ठाकरेंचा दावा

April 7, 2009 5:55 AM0 commentsViews: 1

7 एप्रिल, मुंबई मराठी पंतप्रधान ही मूळ कल्पना आपलीच असल्याचा दावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ' सामना'तल्या मुलाखतीतून केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ' सामना'तून शिवसेना प्रमुखांची प्रदीर्घ मुलाखत सुरू झाली आहे. या मुलाखतीच्या तिस-या भागात बाळासाहेब ठाकरे मराठी पंतप्रधानपदाच्या पदाच्या मुद्द्यावर बोललेत. एनडीएची स्थापना होण्यापूर्वीच पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता, असं त्यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तुम्ही दिल्ली सांभाळा, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, असा सल्ला पवारांना दिल्याचं शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार भैरोसिंग शेखावत अपक्ष म्हणून उभे होते. त्यामुळे प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देऊन आपण एनडीएचा विश्वासघात केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर भारतातले नेते हिंदी भाषिक म्हणून एकत्र येतात. पण मराठी माणसांची एकजूट आम्ही उभारली तर प्रांतीयवादी ठरतो, असंही ते त्या मुलाखतीत म्हणालेत. मनमोहन सिंग यांच्यासह मधल्या काळातल्या पंतप्रधानांनी त्या पदाची थट्टा केली आहे. आता लालकृष्ण अडवाणीच त्या खुर्चीची आब राखतील, असं बाळासाहेबांनी मुलाखतीतून सांगितलं आहे. पण असं असलं तरी बाळासाहेबांनी आपल्या रविवारच्या भाषणात भाजप आणि अडवाणींचा उल्लेखही टाळला होता.

close