छमछम बंदच, राज्य सरकार डान्सबार बंदी विधेयक आणणार !

May 8, 2014 6:43 PM0 commentsViews: 1718

mumbai_dance_bar_08 मे : राज्यात छमछम बंदच राहणार यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. डान्स बार बंदीसाठी येणार्‍या पावसाळी अधिवेशनात डान्स बार बंदी विधेयक आणणार अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधान परिषदेत केली.

तसंच डान्स बार बंदीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ, असंही पाटील यांनी सांगितलंय. मागील वर्षी 16 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी उठवली होती. महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट 2005 मध्ये डान्सबार बंद केले होते. याप्रकरणी डान्सबार चालकांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने डान्सबार चालकांना दिलासा देत बंदी उठवली होती. पण राज्य सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

पण सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम राखत बंदी उठवली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळे हजारो डान्सबारना जीवनदान मिळाले.  राज्यसरकारने बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत तब्बल 700 डान्स बार होते तर उर्वरीत महाराष्ट्रात एकूण 650 डान्सबार होते. आता ही संख्या दुपट्टीने वाढलीय. तर दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयामुळे बेरोजगार झालेल्या 75 हजार बारगर्ल्स आणि एकूण दीड लाख लोकांना पुन्हा रोजगार मिळेल असा दावा बारचालक संघटनांनी केलाय. विशेष म्हणजे डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय आर आर पाटील यांनी 2005 साली गृहमंत्री असतानाच घेतला होता. वर्षभरातनंतर पुन्हा एकदा आबांनी छमछमवर बंदी आणण्यासाठी विधेयक आणणार असल्याची घोषणा केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close