वाराणसीत मोदींचं जोरदार शक्तिप्रदर्शन

May 8, 2014 10:55 PM0 commentsViews: 2245

8879_Narendra_Modi08 मे : निवडणूक आयोगाविरोधात संघर्षानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी वाराणसीमध्ये धडाकेबाज एंट्री झाली. मोदींचा ताफ्या नियोजित सभा स्थळाकडे निघाला असता याला भव्य असं रॅलीच स्वरूप आलं.

मोदींनी एकाप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन करुन निवडणूक आयोगालाच प्रत्युत्तर दिलं. काशी हिंदू विश्वविद्यालयापासून वाराणसीतल्या रथयात्रा चौकातल्या भाजपच्या कार्यालयाकडे मोदी रवाना झाले होते तेव्हा भाजपचे हजारो कार्यकर्ते यात सहभाग झाले. वाराणसीतले रस्ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते. ठिकठिकाणी गळ्यात भाजपचा पट्टा घेऊन कार्यकर्ते ‘अब की बार मोदी’ सरकारच्या घोषणा देत होते. मोदींच्या ताफ्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाचा जयघोष करुन परिसर दणाणून सोडला होता.

रोहिनिया इथं झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. मी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, कारण मी, ‘एक भारत, श्रेष्ठ भारताचं’ स्वप्न पाहत आहे. पण आता काँग्रेस माझी जात कोणती हे शोधण्याच्या मागे लागलीय असा आरोप मोदींनी केला. मोदी मरणे पसंत करेन पण खोटं बोलणार नाही. मी जातीपातीच राजकारण करत नाही म्हणून मी शांत बसतो यामुळे माझ्यावर खोटे आरोप तरी करू नका असा सल्लाही मोदींनी दिला. तसंच काँग्रेसला जनतेनं हरवलं आहे त्यांना निवडणूक आयोग जिंकून देणार नाही. निवडणूक आयोगाने आत्मपरीक्षण करावं, भारत हा लोकशाहीचा देश आहे त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं काम तुमच्या हातून होऊ नये असा टोलाही मोदींनी लगावला.

दरम्यान, निवडणूक आयोगाने सभेला परवानगी नाकारल्यामुळे दिल्ली, वाराणसीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं, धरणं आंदोलनं केलं. दिल्लीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला. भाजपचे नेतेही यात सहभागी झाले होते. मात्र निवडणूक आयोगाने संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आयोग नि:पक्षपातीपणे काम करत आहे असं बजावून सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close