नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे

May 9, 2014 5:06 PM0 commentsViews: 505

narendra dabholkar09 मे : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास कोण करणारा यावर अखेर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलंय. दाभोलकर खुनाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचा महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाभोलकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांच्या बाजूने निर्णय देत तपास सीबीआयकडे देण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

काल गुरुवारी या प्रकरणावर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतंय या प्रतिज्ञापत्रात सीबीआयकडे तपास सोपवण्याची आवश्यकता नाही अशी विरोधाची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. तसंच या तपासाबाबत पुणे पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही, असंही सीबीआयने सांगितलंय. तर आम्ही दोन आरोपींना अटक केलीय मात्र त्याच्यांविरोधात आम्ही केस उभी करू शकलो नाही, अशी कबुलीही पुणे पोलिसांनी दिली होती.

पण, या प्रकरणाची व्याप्ती इतर राज्यातही पसरलीय, त्यामुळे तपास सीबीआयकडे द्यावा असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने राज्य सरकाराची मुद्दा खोडून काढत तपास सीबीआयकडे देण्यात यावा असा निर्णय दिलाय. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला नऊ महिने पूर्ण झाले आहेत पण अजूनही मारेकरी मोकाटच आहेत त्यामुळे सीबीआयकडे आता तपास दिलाय आता तरी आरोपी पकडले जातील अशी अपेक्षा दाभोलकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close