दलित तरुणाची मृत्यूशी झुंज, आरोपी मात्र जामिनावर मोकाट !

May 9, 2014 6:31 PM1 commentViews: 1662

09 मे : अहमदनगरमध्ये नितीन आगे दलित तरुणाच्या हत्याकांड प्रकरणानंतर राज्यात अनेक ठिकाणी दलितांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशीच एक अत्याचाराची घटना घडली सागर जाधव या तरुणासोबत. सागरला गावातील काही गावगुंडांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली या मारहाणीत सागर जायबंदी झालाय पण कायद्याच्या पळवाटा शोधून आरोपी मात्र मोकाट फिरत आहे तर सागर मृत्युशी झुंज देत आहे.

ही घटना घडली पुणे जिल्ह्यातील इंंदापूर तालुक्यातील भिगवण गावामध्ये. 28 फेब्रुवारीला मित्राच्या बायकोची गुंडांनी छेड काढली होती. याचा जाब विचारला पण यावरही गुंडांची मस्ती काही थांबली नाही म्हणून सागर आणि त्याच्या मित्रानं भिगवण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे संतापलेला गावगुंड असलेल्या आबा देवकाते याच्या भाडोत्री गुडांनी सागरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागर जायबंदी झालाय. त्याच्या शरीराची एक बाजू विकलांग झालीय. एकीकडे सागर निपचित पडून आहे. तर दुसरीकडे अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानं ते मोकाट फिरत आहेत. आबा देवकातेसह प्रमुख 3 आरोपींना पोलिसांनी अटकच केली नाही तर ज्या 15 गुंडांना अटक केली त्यांची जामीनावर सुटका झालेली आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने राजकीय पक्ष तसंच संघटनाही सध्या शांत आहेत. मात्र जाधव कुटुंब सागरच्या उपचाराचा 10 लाखावर गेलेला खर्च कसा पेलायचा तसंच मोकाट फिरत असलेल्या गावगुंडांचा मुकाबला कसा करायचा या चिंतेत आहे. उठता बसता शाहू-फुले- आंबोडकरांचं नाव घेणारे सर्वपक्षीय पुढारी जाधव कुटुंबीयांच्या व्यथेकडे लक्ष देतील का ? असा सवाल आता उपस्थित झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anand Patekar

    उठता बसता शाहू-फुले- आंबेडकरांचं नाव घेणारे पुढारी हे फक्‍त मते
    मिळविण्‍यासाठीच शाहू-फुले- आंबेडकर यांचे नावाचा वापर करतात त्‍यांना
    दलीत व सामान्‍य जनतेशी काहीही देणे घेणे नाही

close