मतदान केलं म्हणून मतदारांना मारहाण !

May 9, 2014 6:44 PM0 commentsViews: 1241

09 मे : लोकशाहीतलं सर्वात मोठं कर्तृव्य म्हणजे मतदान. मतदानाचा हक्क बजावा असं सगळ्यांकडून सांगितलं जातं पण जम्मू आणि काश्मीरमधल्या कुपवाडा इथं मतदानात सहभागी झाल्याबद्दल काही मतदारांना मारहाण झालीय. काही गटांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. पण त्याला न जुमानल्याबद्दल या मतदारांना मारहाण करणं, त्यांचे कपडे फाडणं आणि त्यांना गद्दार म्हणणं असे प्रकार समोर आलेत.

कुपवाडामधल्या या मध्यमवयीन मतदाराला मतदान केल्याची शिक्षा म्हणून काही युवकांनी मारहाण केली आणि नंतर त्याचे कपडेही फाडले. सोपोर आणि बारामुल्लामध्ये फुटीरवादी गटांनी मतदानावर बहिष्काराचं आवाहन केलं होतं आणि दगडफेकही केली होती. त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या मतदारांना गद्दार म्हणण्यापर्यंत या गटाची मजल गेली.

ही चांगली बाब नाही. याबाबतीत प्रशासन आणि हुर्रियतनं आपापली भूमिका स्पष्ट करावी. मतदान आणि बहिष्कार हा मतदारांचा अधिकार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि मारहाण करणार्‍यांना आपला पाठिंबा आहे का ते हुर्रियतनं स्पष्ट करावं अशी मागणी पीडीपीचे नेते जावेद अहमद दार यांनी केली.

बारामुल्लामध्ये मतदानाच्या दिवशी काही युवकांचा सरकारी यंत्रणेशी संघर्ष झाला. त्या ठिकाणी मतदान कमी झालं. कुपवाडामध्ये मात्र 60 टक्क्यांहून जास्त मतदान झालं. त्यामुळे चवताळलेले निदर्शक बसस्टँडवर गस्त घालतात आणि मतदारांच्या बोटावरची शाई तपासतात. ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांना जाऊ देतात, तर मतदान केलेल्यांना मारहाण करतात. हा प्रकार थांबवण्यासाठी कित्येक तास प्रशासनाने काहीच केलं नाही. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सीएनएन आयबीएनला सांगितलं की, हे युवक मुखवटे घालून फिरत असल्याने त्यांची ओळख पटवता येत नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं अवघड आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मतदारांना मारहाण प्रकरणी ट्विट वरून टीका केलीये. “मतदारांना धमकावणार्‍या टोळक्यांची गय केली जाणार नाही. मतदान न करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच मतदान करण्याचंही स्वातंत्र्य आहे. मतदारांना धमकावताना कोणीही आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांना तशा सूचना केल्या आहेत” असं अब्दुल्ला यांनी बजावलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close