दलालांमुळे हापूस अडला दारी !

May 11, 2014 3:16 PM0 commentsViews: 379

दिनेश केळुसकर ,रत्नागिरी

11 मे : युरोपातल्या देशांच्या आयात बंदीमुळे हापूसच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला खीळ बसली असली तरी खर्‍या अर्थाने हापूसच्या अर्थकारणाला गेली अनेक वर्षं वेढा पडलाय तो दलालांचा. देशी बाजारपेठेची व्याप्ती मोठी आहे. पण या बाजारपेठेत आंबा पाठवण्यासाठी शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा मिळाल्या तर निर्यातीचीही गरज उरणार नाही.

देवगडचे विद्याधर जोशी हे युरोपगॅप सर्टीफाईड आंबा शेतकरी. निर्यातीवर अवलंबून न राहता ते देशी बाजारपेठेतच हापूसचा व्यापार करतात. युरोपने हापूसवर घातलेल्या बंदीपेक्षाही हापूस शेतकर्‍यांची वाशी मार्केटमधल्या आंबा दलालांकडून होणारी गेल्या अनेक वर्षांपासूनची पिळवणूक आधी थांबायला हवी असा त्यांचा आग्रह आहे.

जगभर पोहोचणार्‍या आंब्यासाठी कोकणात हापूस प्रक्रिया आणि निर्यात केंद्र सुरू करण्यात आली आहेत. स्थानिक शेतकर्‍यांना अशा कंपन्यांचा फायदा होत असल्याचं सांगण्यात येतं.

‘डोमेस्टीक मार्केट जरी आम्ही कव्हर केलं तरी कितीतरी पटीने आंबा देशात जाऊ शकतो. प्रत्येकाचा गावागावात जर आंबा पोहोचला तर आखाती किंवा युरोपला पाठवण्याची गरजच राहणार नाही. देशातच आमचा आंबा
संपेल.’ असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी साटम यांनी व्यक्त केला.

कोकणचं अर्थकारण सुदृढ करणारी हापूस ही खरोखरच मोठी ताकद आहे. पण ऍपेडासारखी मार्केटिंग यंत्रणाच दिवसेंदिवस कुचकामी ठरत आहे. या यंत्रणेत सुधारणा झाली तर आर्थिक सबलीकरणासाठी आंबा उत्पादकांना केवळ निर्यातीवर अवलंबून राहावं लागणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close