काँग्रेस-भाजपनं सत्तेसाठी जनतेला दाखवली प्रलोभनं – मायवतींचा आरोप

April 8, 2009 10:57 AM0 commentsViews: 2

8 एप्रिल काँग्रेससह सगळ्याच सत्ताधारी नेत्यांवर टीकेची झोड उठवत, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराला सुरुवात केली. नागपूरच्या या सभेत, मायावतींनी काँग्रेससह भाजपा आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं. ' काँग्रेस आणि भाजपनं आजपर्यंत मतदारांना निरनिराळ्या प्रकारची प्रलोभनं दिली. पण वचनपूर्ती काही नीटशी केली नाही. मागासवर्गीयांबरोबरच या सत्ताधार्‍यांनी उच्चवर्गीयांनाही दु:खाच्या खाईतच लोटलं. असा आरोप मायावतींनी नागपूरच्या सभेत केला. प्रचंड प्रमाणात जमलेल्या लोकांसमोर, आपला पक्ष सगळीकडे स्वबळावरच निवडणुका लढवणार असल्याचही मायावतींनी जाहीर केलं. यावेळी विदर्भातले बसपा उमेदवार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूरमध्ये येण्यापूर्वी मायावतींची आज लखनऊमध्ये सभा झाली. त्या सभेतही त्यांनी विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगावर टीका केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही महत्त्वाच्या उमेदवारांची बदली निवडणूक आयोगानं केली आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान काही दुर्घटना घडल्यास त्यांची जबाबदारी सरकार घेणार नाही, असं मायावती यांनी स्पष्ट केलं आहे.

close