मुंबईमध्ये वर्षभरात 111 अल्पवयीन मुलींचे गर्भपात !

May 11, 2014 8:43 PM0 commentsViews: 1570

अद्वैत मेहतासह प्रणाली कापसे, मुंबई

11 मे : मुंबईत गेल्या वर्षभरात निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये 15 वर्षाखालील मुलींचे गर्भपात करण्याच्या तब्बल 111 घटना घडल्या असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. राज्यात सर्व गर्भपातांची नोंद ठेवणं सक्तीचं आहे. तशी नोंदणी केली जाते का हे तपासण्यासाठी आरटीआय कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी गर्भपातांची माहिती मागवली, तेव्हा अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं.

मुंबईतल्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 30, 117 गर्भपात करण्यात आले. त्यापैकी 22,846 हे निरोध फसल्यामुळे राहिलेल्या गर्भाचे करण्यात आले. 10 हे बलात्कारामुळे राहिलेल्या गर्भांचे, 111 हे अल्पवयीन मुलींचे गर्भपात करण्यात आले. 2073 गर्भपाताच्या कारणाची नोंदणी करण्यात आली नाही. अत्याचारामुळे गर्भधारणांचं प्रमाण वाढत असल्यास पोलिसांमध्ये तक्रार करण्यात यावी असंही आवाहन केलं जातंय.

अल्पवयीन मुलींशी ठेवलेले संबंध हा कायद्याने बलात्कारच आहे. पण हे कृत्य करणार्‍यांविरोधात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी आहे ही बाबही या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होतेय.

मुंबईतील गर्भपात

– वर्षभरात 30117 गर्भपात
– 22,846 गर्भपात निरोध फसल्यामुळे
– 10 गर्भपात बलात्कारामुळे
– 111 गर्भपात अल्पवयीन मुलींचे
– 2073 गर्भपातांच्या कारणाची नोंदणी नाही

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close