विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार-पाटील

May 14, 2014 5:28 PM0 commentsViews: 1712

14 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे पण दुसरीकडे राज्यात आघाडी आणि विरोधकांना विधानसभेचे वेध लागले आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालीच निवडणूक लढवणार अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयबीएन लोकमतच्या ‘न्यूजरूम गप्पा’ या कार्यक्रमात केली. एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेसाठी काँग्रेसने आदर्श घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. एकाप्रकारे अशोकरावांचं राजकीय पुर्नवसन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाली. अशोक चव्हाण जर लोकसभा निवडून आले तर एखाद्यावेळेस काँग्रेस राज्यामध्ये मोठी जबाबदारी चव्हाण यांच्यावर टाकणार असे तर्कविर्तक लढवले जात आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी यावर पडदा टाकलाय. येणार्‍या निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची उणिवा जाणवली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात विलासरावाच्या सभेची गोष्ट वेगळी असायची ज्या पद्धतीने विलासराव सभा गाजवायचे ते सगळ्यांनी पाहिलंय अशी आठवणही पाटील यांनी व्यक्त केली. तसंच पुढील महिन्यात होणार्‍या अधिवेशनात 13 विधेयक मांडणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. या अधिवेशनात टोल, एलबीटीसह अन्य मुद्यांवरही चर्चा करणार असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close