मोदींचा झंझावात; 440 सभा,4 हजार ‘चाय पे चर्चा’, 3 लाख किमी प्रवास

May 15, 2014 6:53 PM1 commentViews: 1335

स्नेहल बनसोडे, मुंबई

15 मे : प्रचाराच्या तोफा 10 मे रोजीच थंडावल्या. झंझावाती प्रचार सभांची आणि टीव्हीवर सातत्याने मोदींना पाहण्याची लोकांनाही सवय झाली होती. गुजरातचे मुख्यमंत्री ते भाजपचा राष्ट्रीय चेहरा बनलेल्या मोदींच्या सभांचा हा आढावा.

आठ महिन्यांपूर्वी 13 सप्टेंबर रोजी मोदींच्या नावाची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली.पक्षांतर्गत रुसवे-फुगवे, अडवाणींसह ज्येष्ठांची नाराजी यामुळे भाजपच एकसंध राहतेय की, नाही असं सुरुवातीला वाटत होतं. पण मोदींच्या झंझावाती प्रचार दौर्‍यांनी पकड घेतली आणि शेवटी प्रचार संपेपर्यंत ‘भाजप म्हणजे मोदी’ असं समीकरण बनवण्यात मोदी यशस्वी झाले. जम्मू पासून चेन्नईपर्यंत आणि कोहिमापासून जैसलमेरपर्यंत मोदींनी अख्खा भारत पिंजून काढला.

मोदींचा झंझावात
- मोदींच्या एकूण सभा- 440
- 5827 सभांना उपस्थिती
- त्यापैकी 4000 ‘चाय पे चर्चा’
- 1350 थ्री डी रॅलीज
- देशातल्या 25 राज्यांमध्ये सभा
- 3 लाखांहून जास्त किमी प्रवास

भाषणांच्या झंझावातांनी त्यांची खास स्टाईल तयार झाली.. त्यांचं ‘मित्रों’ हे संबोधन,…साध्या हिंदीतून त्यांनी लोकांशी संवाद साधला. सुरुवातीला मोदींची भाषणं नम्रतेनं सुरू व्हायची. मी तुमचा शासक नाही तर सेवक बनायला आलोय. काँग्रेसला 60 वर्षं सत्ता दिलीत मला 60 महिने तरी द्या असं आर्जवानं सांगणारे मोदी नंतर आक्रमक होत गेले. संजय बारुंच्या पुस्तकानंतर ते सर्रास `माँ बेटे की सरकार` असं सांगत टीका करू लागले. राहुल गांधींचा ‘शहजादा’ हा उल्लेख चांगलाच गाजला.

नरेंद्र मोदी “माँ- बेटे की सरकार के दिन भर खत्म हो गए है, ये युवराजजी क्या जानेंगे गरिबी क्या होती है? ये तो चांदी का चम्मच लेके पैदा हुए है, ‘मुझे इस देश का चौकीदार बनाइये, मैं इस देश की भली भाँती रक्षा करुंगा.”

ज्या ठिकाणी मोदींचं भाषण तिथे स्थानिक इतिहास आणि मुद्दे हे आवर्जून आले. इतकचं काय एखादा मुद्दा राहिला तर पुढच्या
सभेत तो मांडून मागच्या भाषणाची पूर्तता ते करताना दिसत.

मोदींचं भाषणं प्रेक्षणीयही असायची, कारण ते जिथं जायचे तिथली वेशभूषा ते करायचे..सुरुवातीला मुस्लिमांची टोपी नाकारणारे मोदी नंतर ज्या प्रांतात जातील तिथला पेहराव विशेषत: टोपी आवर्जून घालायचे. ‘चाय बेचनेवाला..’ असं म्हणत त्यांनी स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण केली. मोदींनी प्रचाराच्या मात्र खूप वेगवेगळ्या तर्‍हा वापरल्या. प्रत्यक्ष भाषण ते ‘थ्री डी’ तंत्रज्ञानाचा वापर, इंटरनेट वेड्या तरुणांसाठी ट्विटर आणि गुगल हँगआऊटवर मोदी सतत दिसत राहिले. पहाटे पाच वाजता सुरू होणारा मोदींचा दिवस रात्री उशिरा संपायचा. प्रचारात हिट ठरलेली ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा आता प्रत्यक्षात येणार का हे लवकरच कळेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amit Shinkar

    भारतवर्षाला अनेक वर्षांनंतर मोदींच्या रूपाने एक स्वयंसिद्ध असा नेता लाभलाय!

close