‘टीम मोदीं’चं 17 तारखेला खातेवाटप ?

May 15, 2014 8:22 PM0 commentsViews: 3053

BJP Mets Banner15 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ राहिलाय आणि निकालाचा कल बघता सत्ता स्थापनेच्या दिशेनं भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे आता नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

17 तारखेला दिल्लीत नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्याची तयारी भाजपनं केलीय. त्याच दिवशी होणार्‍या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मंत्रिपदाच्या खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सोळाव्या लोकसभेचा निकाल उद्या लागणार आहे. पण, त्याआधीच विजयाचा विश्वास असलेल्या भाजपमध्ये मोदी सरकार कसं बनवायचं याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. आज (गुरुवारी) राजनाथ सिंग यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. अडवाणींसमोर
लोकसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. अडवाणींनी हा प्रस्ताव स्वीकारला तर राजनाथ सिंग यांच्याकडे अधिक मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे. आज भाजप आणि संघ नेत्यांच्या बैठकीमध्ये एकूणच पदभारासंदर्भात चर्चा झाली.

अजून निकाल आला नसला तरी मोदी सरकारच येणार याची भाजपला खात्री वाटतेय. स्वत: नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये असले तर राजधानी दिल्लीत वातावरण चांगलंच तापलेलं होतं. गुरवारी उमा भारती यांनी लालकृष्ण अडवाणी आणि त्यानंतर दोन वेळा नितीन गडकरींची भेट घेतली. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी, रामलाल आणि मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांची पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी तीन तास बैठक चालली. मोदींचं मंत्रिमंडळ कसं असेल, यावर यात चर्चा झाली असेल, हे उघडच आहे. पण, निकाल हाती येण्याआधी पक्षाकडून काहीच सांगितलं जात नाहीय.

यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणुकीत इतक्या उघडपणे भूमिका बजावलीय. त्यामुळे नव्या सरकारकडून त्यांच्याही काही अपेक्षा असणार आहे. सरकारमध्ये ज्येष्ठ नेत्यांचा योग्य आदर राखला गेलाच पाहिजे, असा संदेश संघानं दिलाय. त्यामुळे

 • - लालकृष्ण अडवाणींना लोकसभा अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं.
 • - अडवाणी लोकसभा अध्यक्ष जाले तर त्यांचं ज्येष्ठत्वही कायम राहील
 • - तर राजनाथ सिंह यांनाही सरकारमध्ये स्थान असावं, अशी संघाची इच्छा आहे.
 • - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह यांना दुसर्‍या क्रमांकाचं स्थान हवंय.
 • - संघाची इच्छा पूर्ण केली जाईल. पण, त्यांनी सरकारच्या रोजच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे संकेत मोदी गटाने दिले आहे
 • - सोबतच यापुढे मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कुठल्याही मध्यस्थाविना थेट चर्चा होईल.

पण, भाजप आणि संघामध्ये असा कुठलाच तणाव नसल्याचं संघ पदाधिकारी सांगत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या
लोकप्रियतेचा उपयोग संघटना विस्तारासाठी करण्याचा संघाचा विचार आहे. मोदींकडे आकर्षित झालेल्या तरुणाला संघाकडे वळवणं आणि शाखा हे मुद्दे संघाच्या अजेंड्यावर आहेत.

 

कुणाला कोणतं मंत्रिपद मिळू शकतं ?

 • - अरुण जेटली – अर्थ किंवा परराष्ट्र खातं
 • - मुरली मनोहर जोशी – परराष्ट्र विभाग किंवा अर्थ
 • - राजनाथ सिंह – गृह
 • - सुषमा स्वराज – संरक्षण
 • - जन. व्ही.के. सिंग – संरक्षण राज्य मंत्री
 • - नितीन गडकरी – रेल्वे किंवा पायाभूत सुविधा, गडकरी गृहखात्यासाठी आग्रही असल्याचीही माहिती
 • - राम विलास पासवान – आरोग्य किंवा कृषी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close