मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, उमेदवार ‘टेन्शन’मध्ये

May 15, 2014 9:19 PM0 commentsViews: 1325

56election_counting

15 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. मतमोजणीसाठी मुंबईसह, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देशमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. राज्यात तीन टप्प्यात मतदान घेण्यात आलं होतं. एकूण 48 जागांसाठी मतदान पार पडलं. मतमोजणीच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. राज्यात जवळपास सरासरी 60 टक्के मतदान झालंय. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे सत्तापरीवर्तनाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीच्या आशा पल्लवीत झालीय एक्झिट पोलमध्ये महायुतीला 30 पेक्षा जास्त जागा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे आपला निकाल काय लागणार याची चिंता सर्वच उमेदवारांना लागली आहे.

नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त

नागपूरच्या कळमना बाजार परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी घेतला. मतमोजणीच्या दिवशी काही गैरप्रकार होवू नये म्हणून शहरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असणार्‍यांना स्थानबद्द ठेवण्यात आलंय तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं पोलीस आयुक्तांनी सांगितले. नागपूर आणि रामटेक मतदार संघातील मतमोजणी कळमना बाजार परिसरात होणार आहे. 1500 पोलीस यासाठीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

पुणे आणि बारामती मतमोजणीसाठी सज्ज

पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या 4 मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. पुणे आणि बारामती या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य मंडळाच्या गोदामामध्ये होईल. तर मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे- बालेवाडीच्या क्रीडानगरीत होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत पुण्याचा निकाल हाती येईल.

अकोला सज्ज

अकोल्यातील खदान परिसरातील शासकीय धान्य गोदाम इथं 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीची वेळ जशी जवळ येत आहे. तसे प्रशासनासोबतच उमेदवारांचेही टेन्शन वाढत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान घेण्यात आले होते.

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पश्चिम,अकोला पूर्व, आकोट,बाळापूर,मूर्तिजापूर व रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्या अंतर्गत 1 हजार,774 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. मतदानानंतर अकोला मतदारसंघातील सात उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशिनमध्ये सीलबंद झाले. मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची 14 टेबलवर या प्रमाणे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. एकूण 25 फेर्‍यांमध्ये मतमोजणीची प्रकिया पूर्ण होणार आहे. त्यात आकोट 20, बाळापूर 22, मूर्तिजापूर 25, अकोला पश्चिम 17, अकोला पूर्व 22 आणि रिसोड मतदारसंघाची मतमोजणी 23 फेर्‍यांमध्ये होणार आहे. यानंतर निकाल जाहीर होईल. मतमोजणीच्या दिवशी पोलीस दलानं 4 पोलीस निरीक्षक, 8 उपनिरिक्षक, केंद्रीय आणि राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात केलीय. शिवाय शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close