आज फैसला जनतेचा, कोण होणार पंतप्रधान ?

May 16, 2014 5:39 AM0 commentsViews: 1551

21rahulvsmodi16 मे : आजचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातला खूप महत्त्वाचा दिवस..देशाच्या 16 व्या लोकसभेसाठी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होतेय. लोकसभेच्या 543 जागांसाठी एकूण 9 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली. 7 एप्रिलपासून 12 मेपर्यंत ही निवडणूक सुरू होती. एकूण 81 कोटी मतदारांपैकी 66 टक्के म्हणजे जवळपास 53 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निव्वळ भारताच्याच नाही तर जगाच्या लोकशाही इतिहासातला हा सर्वात प्रचंड आणि यशस्वी असा निवडणुकीचा प्रयोग ठरलाय. मानव जातीच्या इतिहासातला कुठल्याही राज्यव्यवस्थेसाठी एकाचवेळी इतक्या प्रचंड लोकसंख्येनं आपलं शासन निवडण्यासाठी सहभाग घेणं ही अत्यंत अभुतपूर्व अशी घटना आहे. त्यामुळे आज जनतेचा कौल कुणाला ? देशाचा पंतप्रधान कोण ठरणार याकडे सगळ्या जगाच लक्ष लागलंय.

यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेल्या कष्टाला प्रामुख्यानं श्रेय द्यावं लागेल. या निवडणुकीत काही ठिकाणी हिंसाचाराचे गालबोटही लागले. विशेषत: आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि प.बंगालमधील काही मतदारसंघानी ही हिंसक राजकीय स्पर्धा पाहिली. निवडणूक आयोगाने याकाळात तब्बल 331 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली तर 225 लाख लीटर दारू सुद्धा देशभरात जप्त केली. विविध माध्यमांचा प्रचंड वापर, टोकाची राजकीय रस्सीखेच आणि देशाचं नेतृत्व करू पाहणार्‍या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची घसरलेली भाषा ही सुद्धा या निवडणुकीची दुदैर्वानं नोंदवावीत अशी वैशिष्ट्य बनलेली आहेत.

त्याचसोबत काही राज्यात मतदारांची नावं मतदार याद्यांमध्ये नसण्याचेही प्रकार घडले. यामुळे निवडणूक आयोगाला लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. पण एकंदरीतच 125 कोटींच्या आपल्या भारतानं भरभरुन मतदान करुन आपली लोकशाही मूल्यांवरची श्रद्धा किती अतूट आहे याचं दर्शन अवघ्या जगाला घडवून दिलंय. भारतीयांनी आपलं सरकार अशा प्रकारे पुन्हा एकदा निवडलंय. कोणाचं असणार आहे सरकार हे आपण आयबीएन लोकमतसोबत सगळ्या छोट्या-मोठ्या राजकीय घटनांसोबत सर्वात आधी आणि सर्वात अचूक पद्धतीनं पाहणार आहात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close