कोकणात राणेंचं ‘वस्त्रहरण’, दिला मंत्रीपदाचा राजीनामा

May 16, 2014 4:27 PM0 commentsViews: 13850

346rane

16 मे : कोकणात काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गडाला चांगलेच भगदाड पडले आहे. आपल्या मुलाच्या पराभवामुळे नारायण राणे यांच्या राजीनामा देण्याची नामुष्की आलीय. राणेंचा मुलगा डॉ. निलेश राणे यांचा तब्बल 1 लाख 49 हजार मतांनी पराभव झालाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला.

आपल्या मुलाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन नारायण राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फॅक्सने पाठवला आहे. प्रचाराच्या दरम्यान रत्नागिरी- सिंधुदूर्गमध्ये राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष उफाळला होता. याचाच फटका राणेंना बसलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली होती. यामुळे राष्ट्रवादीने केसरकर यांच्या निलंबनाची कारवाई केली पण नरकासुराचा वध करणार असा पवित्रा केसरकर यांनी घेतला होता. अखेर कोकणाच्या जनतेनं सत्ता,दबावाला बळी न पडता राणेंच्या राजवटीचा खालसा केलाय.

सेनेच्या या विजयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट रत्नागिरी गाठली आणि शिवसैनिकांच्या भीमपराक्रमाचं कौतुक केलं. उद्धव यांनी कोकणच्या जनतेचे आभार मानले मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणार असंही उद्धव यावेळी म्हणाले. तसंच बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालं अशी भावनाही व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close