राज यांना ‘टाळी’ आठवली, ‘मातोश्री’वर पुष्पगुच्छ पाठवला

May 17, 2014 9:21 PM0 commentsViews: 10594

16raj317 मे : राज्यात महायुतीला अभुतपूर्व यश मिळालंय हे यश पाहता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या विश्वासू सहकार्‍याला पुष्पगुच्छ घेऊन ‘मातोश्री’वर पाठवलं.

‘मातोश्री’वर सेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी हा पुष्पगुच्छ स्वीकारला. मोदींना पंतप्रधान झाल्यानंतर आपला जाहीर पाठिंबा असेल असं जाहीरपणे सांगणार्‍या राज ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना पुष्पगुच्छ देण्याचं मात्र टाळलंय.

विशेष म्हणजे प्रचाराच्यादरम्यान राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. उद्धव यांनी राज यांच्यावर पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली होती. यावर राज यांनी सेनेवर कडाडून टीका केली होती. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, राज यांनी ‘सूप आणि बटाटवडे’ यावरुनही टीका केली. टाळी जर द्यायची असेल तर फोन का नाही केला असा सवालही राज यांनी विचारला होता.

आता राज्यात सर्व पक्षांचे लक्ष विधानसभेकडे लागले आहे. सेनेच्या यशामुळे राज यांनी मोठ्या मनाने उद्धव यांचं अभिनंदन केलंय यासाठी त्यांनी मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवला आहे त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close