मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष यांच्यातला वाद उफाळला

May 18, 2014 12:51 PM0 commentsViews: 4157

prithvi nd chavan18 मे :  निवडणुकीतल्या दारुण पराभवामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे. सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात कमी जागा अशी केविलवाणी अवस्था राज्यात काँग्रेसची झाली आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारावी यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे जोरदार लॉबिंग करत आहेत.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी काल रात्री उद्योगमंत्री नारायण राणेंशी अर्धा तास चर्चा केली. तर दुसरीकडे दारुण पराभवाला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रभारी मोहन प्रकाश यांची कमकुवत पक्ष संघटना जबाबदार आहे असं भासवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.

या कुरघोडीच्या नाट्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यातला वाद उफाळून आला आहे. दरम्यान उद्या सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक होत असून त्यात राष्ट्रीय पातळीबरोबरच महाराष्ट्रातल्या पराभवाची कारणमिमांसा केली जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी प्रदेश काँग्रेसनं सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांची मुंबईत चिंतन बैठक बोलावली आहे.

या बैठकीत राज्यातल्या दारुण पराभवाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काय चर्चा होते आणि कोणते निर्णय होतात त्यावरही प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close