पराभवाचं खापर कुणावर फुटणार?

May 19, 2014 11:38 AM0 commentsViews: 1849

chavan and thakre19 मे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. राज्यातील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडून होत आहेत.

काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक होत असून त्यात राष्ट्रीय पातळीबरोबरच महाराष्ट्रातल्या पराभवाची कारणमिमांसा केली जाणार आहे. राज्यातही काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं मुंबईत बैठक बोलावली आहे. टिळक भवनात दुपारी एक वाजता होणार्‍या या बैठकीला मुख्यमंत्री, सर्व मंत्री, वरीष्ठ नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

राज्यात 236 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झालीये. एकीकडे मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न माणिकराव ठाकरेंसह नारायण राणे आणि नितीन राऊतांसारखे मंत्री करताहेत. तर दुसरीकडे माणिकरावांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याची मोहिम मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी चालवल्याचीही चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मतांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली आहे.

भाजपला 142, शिवसेनेनला 94, राष्ट्रवादीला 27 आणि काँग्रेसला सर्वात कमी म्हणजे केवळ 13विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात रोष व्यक्त झाल्यानं आगामी विधानसभा निवडणूक आघाडीला कठीण बनलीये, हेच यावरुन स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 27.5 टक्के, शिवसेनेला 20.8 टक्के, काँग्रेसला 18.3 टक्के, आणि राष्ट्रवादीला 16.1 टक्के इतकी मतं मिळालीयत. कधी नव्हे ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

 राज्यात मतांची टक्केवारी

  • भाजप – 27.5 टक्के
  • शिवसेना – 20.8 टक्के
  • काँग्रेस – 18.3 टक्के
  • राष्ट्रवादी – 16.1 टक्के

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close