काँग्रेसचं ‘दुख में सब साथी’,पण आता मिशन विधानसभा !

May 19, 2014 6:18 PM0 commentsViews: 1919

65congress_meeting5619 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यातील दारुण पराभवानंतर प्रदेश कार्यकारणीची आज (सोमवारी) मुंबईत बैठक झाली. जनमताचा कौल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्य केलाय. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत तसंच आगामी निवडणुकांना आम्ही पूर्ण निर्धाराने सामोरे जाऊ असा ठराव आज प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारणीत मंजूर करण्यात आला.

याशिवाय पक्ष आपल्या बाबतीत जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रदेश कार्यकारणीसमोर मांडली. गेल्या दोन दिवसांपासून उठलेल्या वादळानंतर मुंबईतील टिळक भवन इथं प्रदेश काँग्रेसची बैठक पार पाडली. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे पुण्याचे माजी महापौर दीपक मानकर यांनी केली होती.

मात्र या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा टाळण्यात आलीय. पराभव आम्हाला मान्य असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्ली दरबारी टोलवण्यात आलाय. दरम्यान, 21 ते 23 मे दरम्यान जिल्हा स्तरावर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. 21 ते 23 मे या काळात जिल्हा पातळीवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणार असाही निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती देण्यात आली. राज्यात 236 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झालीय. या बैठकीला मुख्यमंत्री, काँग्रेसचे सर्व मंत्री, वरिष्ठ नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close