दहशतवादाच्या मुद्यावरुन पंतप्रधानांचा अडवाणींवर हल्लाबोल

April 10, 2009 4:02 PM0 commentsViews: 3

10 एप्रिल पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. अडवाणींनी आज बिहारमध्ये मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. तर दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना पंतप्रधानांनी पुन्हा आक्रमक होत अडवाणींच्या काळात झालेल्या बाबरी मशिद प्रकरणाचा उल्लेख करत अडवाणींना प्रत्युत्तर दिलं. मात्र यावेळी पंतप्रधानांनी जास्त आक्रमक होत कंदाहार प्रकरणावरुनही अडवाणींवर टीका केली. अडवाणींनी दहशतवाद्यांशी बोलणीसाठी मंत्री पाठवले तर आम्ही मुंबई हल्ल्याच्यावेळी कमांडो पाठवून दहशतवाद्यांचा खातमा केला, अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी केली. तसंच गुजरात दंगलीत शेकडो लोकांचे बळी गेले असले तरीही अडवाणी नरेंद्र मोदींना देशातले सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणत असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. तसंच टीव्हीवर थेट चर्चा करण्याचं अडवाणींचं आव्हानही त्यांनी फेटाळून लावलं आहे. आपण लोकसभा निवडणूक का लढवत नाही याचं आणखी कारणंही पंतप्रधानांकडे तयार होतं, नुकतीच बायपास सर्जरी झाल्यामुळे मला अजूनही अशक्तपणा जाणवतोय, निवडणुकीची धावपळ मला सहन होणार नाहीम्हणूनच मी लोकसभा निवडणुक लढवत नसल्याचं स्पष्ट केलं.

close