सोनिया, राहुल गांधींचे राजीनामे कार्यकारिणीने फेटाळले

May 19, 2014 9:58 PM0 commentsViews: 2082

867congress_sonia_rahul

19 मे : ‘आमचा खूप मोठा पराभव झाला, आम्ही कमी पडलो’ अशी शब्दात काँग्रेसने आपला पराभव तर स्वीकारला पण अत्यंत दुखही व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची आज (सोमवारी) दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत पराभवाची जबाबदारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वीकारली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.

पण कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमतानं हा राजीनामा फेटाळून लावला. राजीनामा देणं हा काही उपाय नाही, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं. सरकार आणि पार्टी चांगल्या गोष्टी जनतेसमोर मांडण्यात कमी पडले, असं मत सर्वांनी व्यक्त केलं. पक्षात मनासारखं परिवर्तन करता आलं नाही, अशी खंतही सोनियांनी व्यक्त केली. पार्टीत उत्तरदायित्व नाही, अशी टीका राहुल यांनी केली. काँग्रेस संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल होणार असे संकेत काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामीच्या तडाख्यात काँग्रेस गारद झालीय. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मिर, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेसला तर खातंही उघडता आलं नाही. हेच नाहीतर अन्य कोणत्या राज्यात काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कर्नाटकमध्ये फक्त 9 जागा काँग्रेसला जिंकता आल्यात. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने 206 जागा जिंकल्या होत्या आणि आता यंदाच्या निवडणुकीत फक्त 44 जागाच पदरात पडल्या आहेत.

राज्यातही ‘दुखवटा’

दुसरीकडे, राज्यातल्या दारूण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. जनमताचा कौल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्य केलाय. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. असा ठराव यावेळी मांडण्यात आला. त्यांच्यासोबत आम्ही आहोत तसंच आगामी निवडणुकांना आम्ही पूर्ण निर्धाराने सामोरं जाऊ असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. पक्ष आपल्या बाबतीत जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश कार्यकारणीसमोर मांडली. नारायण राणे आणि नितीन राऊत यांचे राजीनामे यावेळी फेटाळून लावण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close