पारोळा आगप्रकरणी मॅनेजर आणि सुपरवायझरला अटक : 22 जणांचा होरपळून मृत्यू , 56 जखमी

April 11, 2009 7:21 AM0 commentsViews: 8

11 एप्रिल, जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा दुर्घटनेप्रकरणी सावित्री फायर वर्कच्या मालकासह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.याप्रकरणी मॅनेजर आणि सुपरवायझरला अटक करण्यात आली आहे. फटाक्यांच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीत 23 जण ठार तर 56 जण जखमी झाले आहेत. यापैकी 36 जखमींना पारोळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तसंच गंभीर जखमी झालेल्या 20 जणांना धुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीत फॅक्टरी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. पारोळ्याचे नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या पत्नीच्या नावावर ही फॅक्टरी आहे. या कारखान्यात सुरक्षेची पुरती खबरदारी घेतलेली नव्हती, असा आरोप आता होतोय. या घटनेतले जखमी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. कारखान्याच्या ज्या भागात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे तिथून कामगारांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. पण त्या मृतदेहांचा जळून कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटणं कठीण जात आहे. पारोळा प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश जळगावच्या महसूल आयुक्तांनी दिलेत. आणि मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. फटाका कारखान्याला परवानगी देणा-या सर्व अधिका-यांच्या चौकशीचेही आदेश देण्यात आलेत.

close