‘येस ही विल’, मोदी घेणार 26 मेला पंतप्रधानपदाची शपथ

May 20, 2014 7:03 PM0 commentsViews: 1976

989modi_meet_president20 मे : अखेर तो दिवस ठरलाय. गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधानपदासाठी घोषित झालेले भाजपचे नेते नरेंद्र मोदी येत्या सोमवारी 26 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी याबद्दल औपचारिक घोषणा केली त्यानंतर खुद्ध नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.

राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती केली असून 26 मे रोजी सरकार स्थापनचे निमंत्रण दिलंय. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी 3 हजार मान्यवरांनी निमंत्रण देण्यात येणार आहेत. त्यांनतर पत्रकारांशी बोलतांना मोदींनी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं.

मोदींची संसदीय समितीच्या नेतेपदी निवड

लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने इतिहास रचत दणदणीत विजय मिळवला. एकट्या भाजपने बहुमताचा जादुई आकडा पार करत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर आज मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या नेत्यांनी आज मंगळवारी लोकसभेची पायरी चढली. सकाळी 11 च्या सुमारास संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोदी संसदेच्या पायर्‍यांवर नतमस्तक झाले.

या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि एनडीएचे सर्व घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला भाजपच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन दिलं. अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद, व्यंकय्या नायडू आणि इतर नेत्यांनी मोदींच्या नावाच्या प्रस्तवाला अनुमोदन दिलं. यानंतर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करत घोषणा केली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून सक्षम आहेत असं सागत राजनाथ म्हणाले की ‘यस ही विल’ हे म्हणून त्यांनी बराक ओबामांच्या प्रचाराचं घोष वाक्य ‘यस वी कॅन’ची आठवण करून दिली.

मोदींना अश्रू अनावर

या घोषणेनंतर मोदींचं अभिनंदन करताना लालकृष्ण अडवाणी भावूक झाले. मी आज जेव्हा मोदींना भेटलो, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मोदींनी आमच्यावर कृपा केली म्हणून त्यांच्यामुळे आज हे दिवस पाहण्यास मिळाले असं सांगत अडवाणींची डोळे पाणावले. यानंतर, नरेंद्र मोदींनी भाषण केलं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींनी भावूक झाले. आज जर वाजपेयी इथं असते, तर सोन्याहून पिवळं झालं असतं अशी आठवण मोदींनी काढली.

अडवाणीजी, आपण म्हणालात की, मोदींनी कृपा केली. आपल्या आईवर कोणी कृपा, उपकार करत नसतो’ भाजप माझ्यासाठी आई आहे मी जे केलं ते माझ्या आईसाठी केलं. आईची सेवा ही कधी तिच्यावर केलेली कृपा असते का ? असं म्हणत नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमानंतर मोदींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. मोदींनी यावेळी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close