गुजरातमध्ये भाजपनं केलं नॅनो कारच्या बचतपेट्यांचं वाटप

April 11, 2009 10:53 AM0 commentsViews: 5

11 एप्रिल, गुजरात गौरव शाह2009च्या आगामी निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमध्ये भाजपतर्फे नॅनो कारच्या बचतपेट्यांचं वाटप करण्यात आलं आहे. 2007 च्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत मोदींचे मास्क लोकप्रिय झाले होते. तर या मोदींच्या मास्कप्रमाणे गुजरातमध्ये नॅनोकारच्या बचत पेट्या किती लोकप्रिय होतायत याकडे गुजरातमधल्या भाजप कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदा भाजपनं नॅनोच्या हजारो मिनी मॉडेल्सचं मतदारांमध्ये वाटप केलं आहे. त्यामागचा उद्देश हाच की औद्योगिकदृष्ट्या गुजरातचा विकास मोदींनी कसा केला याची आठवण या मॉडेलकडे पाहून मतदारांना सतत होईल, असं गुजरातचे भाजप प्रवक्ता यामल व्यास यांचं म्हणणं आहे. ' मोदींनी गुजरातमध्ये गुंतवणूक कशी खेचून आणली याची आठवण देण्यासाठी या मॉडेल्सचं वाटप होतंय. गुंतवणुकदारांना फायदेशीर योजना गुजरातमध्ये आहेत हेच यातून सूचित करायंचय, असंही यामल व्यास म्हणाले. गुजरातमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये कोणती शक्कल लढवायची यासाठी भाजपची एक खास टीम आहे. या टीमनं निरनिराळ्याप्रकारच्या युक्त्या काढल्या आहेत. त्यातलीच ही नॅनो कारची युक्ती आहे, अशीही माहिती यामल व्यास यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा नॅनोच्या प्रकल्पाला विरोध झाला, तेव्हा नरेंद्र मोदींनीच रतन टाटांना मदतीचा हात पुढे केला, हे सांगण्याची हीच खरी वेळ आहे, असं भाजपला वाटतं आहे. बचतपेट्यांसाठी वापरलेली कार जरी ' नॅनो ' असली तरी त्याचा मोठा फायदा उचलण्याचंच भाजपचं स्वप्न आहे.

close