मतदारांना गृहीत धरू नका !

May 21, 2014 11:47 PM5 commentsViews: 3482

pranli_kapse_ibnlokmatप्रणाली कापसे, सीनिअर करस्पाँडंट,IBN लोकमत

सोळावी लोकसभा निवडणूक अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरली. मग तो भाजपचा ऐतिहासिक विजय असो की काँग्रेचा ऐतिहासिक पराभव, जनतेनं पक्षाऐवजी व्यक्तीला बघून केलेलं मतदान असो की निवडणुकीआधीच एखाद्या उमेदवाराला पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून केलेली घोषणा असो… या सर्वच बाबी ऐतिहासिक होत्या… त्याच अर्थी भारतीय लोकशाहीतली एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारी ही निवडणूक अनुभव म्हणून माझ्यासाठी ऐतिहासिकच होती. या निवडणुकीनं अनेक राजकीय समीकरणं बदलली, ठोकताळे बदलले.

 

काहींचा आत्मविश्वास गगनाला पोहोचला तर अनेक दिग्गजांना धूळ चारली. पण मला लक्षात राहिला तो मतदारांच्या मानसिकतेत झालेला बदल… बोल मुंबई बोल या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मुंबईतला सर्वसामान्य माणूस या निवडणुकीकडे कसा बघतोय हे जवळून पाहता आलं. कार्यक्रमादरम्यान काहींनी आपण कुणाला मतदान करणार हे उघड उघड सांगून टाकलं तर काही मात्र आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता लागू देत नव्हते. पण सर्वांच्या बोलण्यात बदल हवाय हे वाक्य मात्र सारखं येत होतं. आता जनतेनं आपला कौल दिलाय. हा कौल, तो बदल घडवून आणू शकेल का? हे तर पुढे येणारा काळ सांगू शकेल. पण कशाला कंटाळले होते मतदार? त्यांना कुठला बदल हवा होता? हे मात्र सहज ओळखता आलंय.

A woman shows her ink-marked finger after voting inside a polling station in the village of Kamshet, in the western Indian state of Maharashtra

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव का पत्करावा लागला याचं मंथन तर केलं जाईलच… पण जनतेनं मात्र त्यांना नाकारल्याचं उघड झालंय. जनतेच्या नाराजीची अनेक कारणं होती. त्यात महागाई, भ्रष्टाचार, चुकीचे निर्णय, निर्णयाची अंमलबजावणी न होणं अशी अनेक कारणं आहेतच… पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण होतं ते मतदारांना गृहीत धरणं हे…एकदा निवडून आलो की मग कुणी आपलं काही करू शकत नाही, ही भावना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांमध्ये दिसून येत होती. त्यात मुंबईतले खासदार तर सेलिब्रिटी असल्याच्या आविर्भावात वावरत होते. त्यांनी जनतेला गृहीत धरलं होतं. पाच वर्षांत प्रत्यक्ष तर सोडाच, पण सार्वजनिक कार्यक्रमात, टीव्हीवरसुद्धा आमच्या खासदारांचं दर्शन घडलं नाही असं मतदार सांगत होते. पण खासदारांना त्याचं काहीच वाटत नव्हतं.

 

पुन्हा तीच आश्‍वासनं, निवडणुकीच्या तोंडावर घाई-घाईत केली जाणारी उद्घाटनं, अशा सगळ्या गोष्टी मतदार राजा जागृत होऊन बघत होता आणि आम्हाला शेंडी लावू नका असं सांगत होता. पूर्वी समाजाचं बारीक निरीक्षण करणारा एखादाच सामाजिक कार्यकर्ता किंवा पत्रकार या सर्व गोष्टी पेपरमध्ये छापून आणायचा, पण तो लेख किती मतदार वाचायचे त्याचा काय परिणाम व्हायचा हा आता इतिहास झालाय. कारण त्याची जागा आता फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरनं घेतलीय. या सगळ्या तंत्रांमुळे सर्व समस्या कमी शब्दात, चित्रांद्वारे, रंजकपणे मोबाईलवर उपलब्ध होतात. त्यामुळे अगदी न्यू वोटर्सपासून ते अनुभवी मतदारांपर्यत प्रत्येक जण या समस्यांकडे लक्ष ठेवून होता आणि आपलं मत बनवत होता, तर दुसरीकडे जुने खासदार मात्र नेतागिरी करण्यातच खूश होते. कोणत्याही खासदाराकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं काहीच नव्हतं… त्यामुळे अखेर राज्य सरकारनं केलेल्या प्रयत्नाचं, नगरसेवकानं आणि आमदारानं केलेल्या कामाचं श्रेय लाटायची वेळ खासदारांवर आली. एकाच कामासाठी नगरसेवकापासून खासदारांपर्यंत प्रत्येकाला मतदार निवडून देतील अशी गल्लत जुन्या खासदारांनी केली. मतदारांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो असा समज त्यांनी करून घेतला. त्यामुळेच अखेर मतदारांनी त्यांना त्याची जागा दाखवून दिली.

sc-asks-ec-to-install-electronic-voting-machines-issuing-paper-receipts-to-voters-for-2014-polls_081013010529

आजवरच्या मतदानाच्या आकडेवारीवरून हे सहज लक्षात येत होते की सुशिक्षित, उच्चभ्रू, नोकरी करणारा किंवा धंदेवाईक असा वर्ग मतदानाकडे पाठ फिरवत होता. मतदान करणार्‍यांमध्ये झोपडपट्टी, अशिक्षित आणि भावनेच्या आधारे मतदान करणार्‍यांचा भरणा होता. त्यामुळे याही वर्षी जुनेच फंडे वापरून आपण जिंकून येऊ अशा स्वप्नाळू वातावरणात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राहिले. त्यांच्या प्रचाराचा भर ही अशाच भागात आणि वर्गात होता. याउलट भाजप-सेनेच्या उमेदवारांनी मात्र नव्या जोमानं ही निवडणूक लढवली. मतदानाकडे पाठ फिरवणार्‍या वर्गांवर त्यांनी आपलं लक्ष केंदि्रत केलं. तरुण, सुशिक्षित मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह निर्माण केला, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाकडे बघण्याची दृष्टी निर्माण केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं भविष्य दुसर्‍यांना ठरवू देऊ नका ही भावना निर्माण केली. निवडणूक आयोगानं केलेल्या जाहिरातींचाही त्यात खारीचा वाटा नक्कीच होता. या सर्व प्रयत्नांचा परिणाम असा झाला की आजवर मतदानाला दांडी मारणारा मतदार बोटाला शाई लावून फेसबुकवर फोटो अपलोड करू लागला. बदलत्या काळात नव्या टेक्निक्स, मुद्दे लक्षात घ्यायला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विसरले. ज्याचा फटका त्यांना ईव्हीएम मशीनमधून लागला.

सोळाव्या लोकसभेतल्या मतदारांची मानसिकता बदललेली दिसली. मुंबईतलं ट्रॅफिक, लोकलमधली गर्दी, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अभाव, वाढलेली महागाई, वाढलेली गुन्हेगारी, असुरक्षितता अशा कित्येक समस्यांना कंटाळलेल्या मुंबईकरांना सत्ताधारी पक्षातला कुठलाही उमेदवार ठोसपणे काही सांगू शकत नव्हता. जुन्याच, गरिबी हटवू, महागाई कमी करू, मागासवर्गीय, मुस्लीम समाजाचे आपणच कैवारी आहोत हा आभास निर्माण करण्याच्या नादात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते फसले आणि नव्या प्रचार मुद्द्यांचा सूर त्यांना शेवटपर्यंत मिळवता आला नाही. याउलट सेना-भाजपचे उमेदवार आशावादी चित्र निर्माण करण्यात यशस्वी झाले. सत्ताधार्‍यांनी जे केले नाही ते आपण जनतेसाठी करू, एकदा संधी देऊन तर बघा, बदल करून तर पाहा हे प्रत्येकाच्या मनात बिंबवण्यात त्यांना यश आलं. थोडक्यात काय तर मतदार आपल्यालाच मतदान करणार, त्यांच्याकडे पर्याय नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हाच अहंकार नेत्यांना नडला आणि त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीतून मतदारांना गृहीत धरू नका हा राष्ट्रीय संदेश जनतेनं राज्यकर्त्यांना दिलाय आणि तोही कुठलीही जाहिरात न करता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Yashdeep Joshi

  प्रणाली तुम्ही केलेले विश्लेषण योग्य आहे. तुम्ही मुंबईचे विश्लेषण केलेत , मी पुण्याचे सांगतो.

  १] मागील निवडणुकीत पुण्यातून जिंकलेला खासदार २-३ वर्षे तिहार जेलमध्ये होता, त्याचे हानिकारक परिणाम पुणेकरांना भोगावे लागलेत. २] प्रामुख्याने पुण्यातील ज्या वैभवशाली गोष्टी दिसतात ; त्या लोकमान्य टिळक -महात्मा फुले-आगरकर-महर्षी कर्वे यांची पुण्याई आहे आणि इंग्रजांच्या काळातच खडकवसला वगैरे धरणे झाल्यामुळे पाण्याच्या बाबतीत पुण्यात इतर शहरांएवढी टंचाई अगदी २०१२ च्या दुष्काळातसुद्धा झाली नाही.

  ३] तथापि , वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार-खासदारांनी काहीही केल्याचे अजिबातच दिसत नाही. BRT च्या नावाखाली जे बांधकाम चालू आहे, त्यामुळे शेकडो लोकांचा जीव गेला. अनेक भागातील उड्डाणपूल ३-४ वर्षे पूर्णच झाले नाहीत. दुसरीकडे सतीश शेट्टी-नरेंद्र दाभोळकर-अलूरकर यांच्या खुनाचा यत्किंचित तपास न लागल्याने लोकांनाही सुरक्षेची शाश्वती उरली नाही.

  रेल्वेच्या बाबतीत तर आम्ही अत्यंत दुर्दैवी आहोत. “पुणे मेट्रो” प्रस्ताव २०१० पासून आजपर्यंत कागदोपत्री मार्गी लागलेला नाही ; प्रत्यक्ष बांधकाम २०२० पर्यंत तरी पूर्ण होईल का? अशी शंका आहे. कधी नेत्यांचे स्वार्थ ; तर कधी “शिवसृष्टीसाठी”जागा आरक्षित करण्यासारखे भावनिक मुद्दे , यांमुळे “पुणे मेट्रो” प्रकल्प खड्ड्यात रुतून बसला आहे.

  १९९५ पासून आज गेल्या २० वर्षांत लोकल ट्रेन वाढल्या नाहीत, आंतरराष्ट्रीय विमानतळ, या बाबतीतही परावलंबित्व . पुण्यामध्ये बसमध्ये फिरताना ड्रायव्हर-कंडक्टर लोकांच्या दादागिरी-उद्धटपणा यांचा अनुभव वारंवार येतो, व ते “इंटक”च्याच कामगार संघटनेचे सदस्य असल्यामुळे त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही.

  ४] तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे – झोपडपट्टी, अशिक्षित आणि अल्पसंख्य लोकांच्या मतांचा वापर करून आपण जिंकून येऊ आणि सुशिक्षित वर्ग नेहमीप्रमाणे मतदानाकडे पाठ फिरवेल ; अशा स्वप्नाळू वातावरणात सत्ताधारी उमेदवार राहिले. त्यात मुंबईप्रमाणे राजधानीचे STATUS नसल्यामुळे, पुण्यातील या समस्त प्रश्नांची आमदार-खासदार-गृहमंत्री इत्यादी महत्वाच्या व्यक्तींनी वेळच्यावेळी दखलसुद्धा घेतल्याचे कधीच जाणवले नाही.

  या सर्वांची परिणती म्हणून बहुतांश पुणेकर नागरिकांनी भाजपच्याच उमेदवारांना पसंती दिली आणि विक्रमी मतांनी पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार जिंकून आले.

 • Ujwal Godbole

  प्रणाली ताई थोडक्यात पण अतिशय सुंदर विश्लेषण ..अभिनंदन…

 • Anamik

  wachun anand zala.
  Khupach chan vishleshan.
  Keep it up

 • https://hedeep.blogspot.in Hemant

  प्रणाली काय योगायोग आहे, असाच साम्य असलेला ब्लोग मी लिहिला आहे तो पण १३ मे २०१४ रोजी …. cant belive

  hedeep.blogspot.in

 • https://hedeep.blogspot.in Hemant

  प्रणाली काय योगायोग आहे, असाच साम्य असलेला ब्लोग मी लिहिला आहे तो पण १३ मे २०१४ रोजी …तुम्ही ब्लोग लिहण्य आधी ८ दिवस . cant belive

  hedeep.blogspot.in

close