पराभवासाठी राहुल गांधींचे सल्लागार जबाबदार -मिलिंद देवरा

May 22, 2014 10:37 AM0 commentsViews: 1701

milind deora

22 मे :  काँग्रेसचे माजी खासदार आणि राहुल गांधींच्या टीममधले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या अपयशाचं खापर त्यांनी राहुल गांधी यांना सल्ला देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांवरच फोडलं आहे. ज्यांनी राहुल गांधींना हे चुकीचे सल्ले दिले त्या काँग्रेस नेत्यांवरही अपयशाची जबाबदारी आहे. राहुल गांधी यांना एकट्याला अपयशासाठी जबाबदार मानता येणार नाही अशा शब्दांत देवरा यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. राहुलच्या सल्लागारांना निवडणुकीचा अनुभव नव्हता, देशातल्या परिस्थितीचं भान त्यांना नव्हतं. या सल्लागारांनी राहुल गांधींना चुकीचे सल्ले दिले आणि त्यामुळेच काँग्रेसचा दारुण पराभव झाला, असं देवरा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

राहुल यांना सल्ला देणारे पक्षाचे कार्यकर्ते काय म्हणातात, खासदार काय म्हणतात याकडे लक्षच देत नव्हते, त्यामुळे त्यांना कधीच मतदारसंघांमधली खरी परिस्थिती समजू शकली नाही. सल्ला देणारे जितके दोषी आहेत तितकेच डोळे बंद करुन त्यांचा सल्ला मानणारेही दोषी आहेत असं ते म्हणाले. त्याशिवय पक्षाचे प्रचारतंत्र, पक्षाचा दृष्टिकोन, पक्षातंर्गत संवाद, सरकार आणि पक्षामधले संबंध या सगळ्या बाबतीत आम्ही चुकत गेलो. पक्षात निर्णय घेण्याआदी मोकळ्या चर्चा आणि वादविवाद व्हायला हवेत असंही देवरा म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामीच्या तडाख्यात काँग्रेस गारद झाली. गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही. 2009 मध्ये 206 जागा जिंकलेल्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या आहे. राज्यातही काँग्रेस काही वेगळी परिस्थीती नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close