नवाझ शरीफ मोदींच्या शपथविधीला हजर राहण्याची शक्यता

May 22, 2014 12:10 PM0 commentsViews: 1084
sharif-congratulates-modi-on-election-victory-160520141750287
22 मे :  भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजी होणार्‍या शपथविधीच्या सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं IBN नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार, शरीफ भारतात येण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.  नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज गटाचे नेते सिद्दीकी उल फारुक यांनी CNN IBNशी बोलताना सांगितलं की, नवाज शरीफ हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत आमंत्रण अजून मिळालेलं नसल्याचंही सांगण्यात आलं. पाकिस्तानकडून आज शरीफ यांच्या भारत भेटीबाबतच्या निर्णयाविषयी खुलासा करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला विविध देशांच्या पंतप्रधान आणि अध्यक्षांना आमंत्रण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.  मोदींनी आमंत्रण दिलेल्यांपैकी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी शपथविधीला येण्याचं निमंत्रण स्वीकारलं आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन जपान दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शहरयार आलम, संसदेचे सभापती डॉ.शिरीन चौधरी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. परराष्ट्र धोरण बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत, असंच एकंदर यावरून जाणवतं आहे.
राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात 26 मे रोजी सायंकाळी सहा वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मोदींसह कॅबिनेटमधील काही मंत्रीही शपथ घेणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close