ही तुतारी फक्त निवडणुकीपुरतीच…?

April 11, 2009 1:34 PM0 commentsViews: 37

11 एप्रिल उदय जाधव तुतारीत सन्मानाची गुंज असते. तसंच विजयाचे सूर छेडण्याची एक ताकदही तिच्यात असते. म्हणूनच शिवाजी राजेंपासून ते आज कालच्या राजकीय नेत्यांपर्यंत स्वागत तुतारीच्या ललकारीवर केलं जातं. सध्या निवडणुकीच्या हंगामात अनेक राजकीय पक्षांना सभेत या तुतारीची गरज भासतेय. अशा अनेक राजकीय पक्षांची सभेत तुतारी वाजवतोय हरीओम गुरव. गेली चौदा वर्षं तो सर्व राजकीय पक्षांच्या सभेत मुख्य नेत्यांना आपल्या तुतारीची सलामी देतोय. निवडणुकीच्या हंगामात त्याला प्रत्येक सभेत सलामी देणं जमत नाही. म्हणून त्यानं सात जणांना तुतारी वाजवायला शिकवलंय. सध्या निवडणुकीदरम्यान त्याची तुतारी तेजीत असल्याचं तो सांगतो. पण निवडणुका संपल्यावर काय ? नंतर हरीओम गुरवच्या तुतारीला कोणी विचारत नाही. इतरवेळी त्याच्यासारख्या लोक कलाकाराकडे सगळेच राजकीय पक्ष पाठ फिरवतात. साडेचारशे वर्षांपूर्वी याच तुतारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात राजाश्रय होता. पण आता सध्याच्या राजकीय पक्षांनी या तुतारीला फक्त सभेपुरतंच मर्यादीत ठेवलंय. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष जसे महापुरूषांच्या नावाचा वापर करतात तसंच लोकांची मनं जिंकण्यासाठी पारंपरिक वाद्याचाही वापर करतात. पण निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्षांना त्याचा विसर पडतो थेट पुढच्या निवडणुकीपर्यत! हरीओम गुरव आणि त्याच्यासह काम करणार्‍या अशाच सात तुतारी वादकांना आपली ही कला घेऊन कुठे जावं याचं उत्तरही राजकीय पक्षांनीच निवडणुकीनंतर दिलं पाहिजे. अन्यथा तुतारी राजाश्रय नाही, लोकाश्रय नाहीच पण राजकारण्यांच्याच आश्रयापुरती निमित्तमात्र ठरेल आणि हरीओम गुरवसारखे अनेक लोक कलाकार उपेक्षित राहतील.

close