काँग्रेसमध्ये फेरबदल;’बाबा’ राहणार,अनेक मंत्री जाणार ?

May 22, 2014 8:16 PM0 commentsViews: 4101

prthviraj and manikrao
22 मे : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न चालवले आहे. काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची खुर्ची शाबूत राहील, असं सूत्रांकडून कळतंय. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, बंटी पाटील आणि डी.पी.सावंत या चार काँग्रेस मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघातच पक्षाला मताधिक्य मिळालं. पण बाकीच्या 14 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मात्र पिछेहाट झालीय. यामुळेच काँग्रेसमध्ये राज्य मंत्रिमंडळ आणि पक्षसंघटनांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे अशी चर्चा दिल्लीतील काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसने मतदारसंघनिहाय चिंतन बैठकांच्या माध्यमातून पराभवाची कारणमीमांसा करायला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा प्राधान्यक्रम ठरवायला सुरुवात केलीय. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज तातडीने मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलवली.

प्रदेश काँग्रेसने बोलवलेल्या चिंतन बैठकांमध्ये मोदी  लाटेचीच चर्चा होत असली तरी ठिकठिकाणच्या मतदानाच्या टक्केवारीमधून पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न होतोय. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या मतांबरोबरच ओबीसी मतंही महायुतीला मोठ्या प्रमाणात वळल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चिंतेत भर पडलीय.

राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा प्राधान्यक्रम कसा आहे?

 • - मराठा आरक्षण
 • - नवं टोल धोरण
 • - LBT रद्द करणे
 • - अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा कायदा (मुंबई, ठाणे आणि पिंपरी चिंचवड मधील कळीचा प्रश्न)
 • - मागासवर्गियांच्या फीचा प्रश्न

काँग्रेसचे 14 मंत्री पिछाडीवर

 • राजेंद्र गावित – 72,575 मतांची पिछाडी
 • शिवाजीराव मोघे – 59,800 मतांची पिछाडी
 • मधुकर चव्हाण – 34,588 मतांची पिछाडी
 • सुरेश शेट्टी – 32,029 मतांची पिछाडी
 • रणजीत कांबळे – 30,230 मतांची पिछाडी
 • संजय देवताळे – 27,289 मतांची पिछाडी
 • पतंगराव कदम – 27,412 मतांची पिछाडी
 • नसीम खान – 26,569 मतांची पिछाडी
 • बाळासाहेब थोरात – 26,270 मतांची पिछाडी
 • नितीन राऊत – 18,540 मतांची पिछाडी
 • पद्माकर वळवी – 14,624 मतांची पिछाडी
 • राधाकृष्ण विखे पाटील – 9,509 मतांची पिछाडी
 • वर्षा गायकवाड – 2,679 मतांची पिछाडी

 

close