145 पैकी फक्त 75 गारपीटग्रस्त सरकारच्या मदतीस पात्र

May 23, 2014 1:00 PM1 commentViews: 397

23 मे : सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे मराठवाड्यातली 80 टक्के शेती नष्ट झाली. कर्जफेड कशी करायची या चिंतेनं मराठवाड्यामध्ये 145 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. पण मदत देण्यासाठी सरकारनं आखून दिलेल्या नियमानुसार फक्त 75 कुटुंबच पात्र ठरलीयेत. एकंदरीतच मदत देण्याविषयीचे सरकारचे निकष आणि भीषण वास्तव यांच्यात ही शेतकरी कुटुंब भरडली जाताहेत.

औरंगाबादमधली संगीता गायकवाड तरुणपणातच विधवा झालीये. तिचे पती शिवाजी गायकवाड यांनी गारपिटीनं झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली. पण त्यांनी बँकेकडून किंवा मान्यताप्राप्त वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेलं नव्हतं, त्यामुळे संगीताला सरकारकडून मदत मिळत नाही.

नांदेड जिल्ह्यातल्या रेखाबाई गारूळे यांच्या पतीनं कर्ज काढून शेतीत बियाणं पेरली शेती चांगली फुलली मात्र गारपीटीनं उद्‌ध्वस्त झाली. कर्जाच्या चिंतेनं रेखाबाईच्या पतीनं विषारी औषधं घेऊन आत्महत्या केली. तपासणी अजूनही सुरू आहे.

मराठवाड्यात एकूण 145 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. त्यातली 75 आत्महत्या मदतीच्या निकषांत बसतात. त्यापैकी 40 कुटुंबाना मदत मिळाली. उरलेल्यांपैकी 46 आत्महत्यांची प्रकरणं मदतीसाठी अपात्र ठरलीत. तर 24 प्रकरणं अजून प्रलंबित आहेत. खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळत नाही. अशा अनेक कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ आलीय.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या

  • मराठवाड्यातील एकूण आत्महत्या 145
  • मदतीस पात्र आत्महत्या 75
  • मदत मिळालेली कुटुंबं 40
  • मदतीस अपात्र ठरलेल्या आत्महत्या 46
  • आत्महत्येची प्रलंबित प्रकरणं 24

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shailesh

    गरजूंना मदत मिळायला हवी हे बरोबर आहे. त्यासाठी काही निकष असणेही तितकेच महत्वाचे आहे. हे निकष जर चुकीचे असतील तर तुम्ही पत्रकारांनी त्यावर अभ्यासपूर्ण बोट ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही नुसती भावनेच्या आधारे टीका करू नये. तुमच्या अशा पत्रकारितेमुळेच दिवसेंदिवस लोक पारंपारिक माध्यमांपेक्षा सोशल माध्यमांवर अधिक विश्वास ठेवतात. नुकतीच झालेली निवडणूक हि पत्रकारांनाही बर्याच गोष्टी शिकवून गेली.