राष्ट्रवादीने पराभवाचं खापर फोडलं काँग्रेसवर !

May 23, 2014 5:15 PM1 commentViews: 1660

46pawar_vs_congress34
23 मे : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभवानंतर राष्ट्रवादीने चिंतन बैठकींचा सपाटा लावलाय. कार्यकर्त्यांना पराभवाच्या दुखातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लमपट्टी केलीय. राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवारांनी पराभवाचं सर्व खापर राष्ट्रवादीवर फोडलंय. देशात काँग्रेसविरोधी वातावरण होतं, त्याचा फटका यूपीएच्या घटकपक्षांनाही बसला, असा अप्रत्यक्ष आरोप पवारांनी बैठकीत केला. तसंच नवी नेतृत्वाची फळी घडवली जाईल नवीन चेहर्‍यांना आणि ज्यांचे पाय जमिनीवर आहेत अशा लोकांना संधी दिली जाईल असंही पवारांनी स्पष्ट केलं. मुंबईत राष्ट्रवादीची चिंतन बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जेमतेम चार जागांवर विजय मिळवता आला. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगल्याच जिव्हारी लागला. पाच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊ ठेपल्या आहेत त्यामुळे शरद पवार चिंतन बैठका घेऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली.

1977 मध्येही पराभव झाला होता पण त्यानंतर यश मिळालं होतं अशी आठवण करुन देत कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न पवारांनी केला. यासाठी तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सोबत नसणार्‍या पक्षांना लोकांनी निवडून दिल्याचं उदाहरण पवारांनी दिलं. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातली परिस्थिती कठीण असली तरी हाताबाहेर गेली नाही. त्यासाठी एकदिलानं आणि जोमानं कामाला लागावं लागेल, अशा सूचना पवारांनी दिल्या. पण त्याचवेळी आता राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार जास्त असल्यानं विधानसभेच्या जागावाटपाचं सूत्र नव्यानं ठरवायला हवं, असं पवार म्हणाले आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागांवर दावा सांगितला जाईल, याचे संकेत दिले.

राष्ट्रवादीने मर्यादीत जागा लढवल्या मात्र 4 जणच निवडून आले. अपेक्षा जास्त होती पण पदरी अपयश आलं. 14 मतदारासंघात आपल्याला यश मिळालं आणि 48 मतदारसंघात निराशा मिळाली. सगळ्या मतांचा आढावा घेतल्यावर लक्षात येतं की, महिली, व्यावसायिक,व्यापारी आपल्यापासून दूर गेल्याचं चित्र दिसतं. सरकारी कर्मचार्‍यांची मतंही दूर गेली असल्यामुळे प्रशासनाशी आपला सुसंवाद कमी झालाय. तामिळनाडू, पश्चिम बंगाल ओरिसा, आंध्रमध्ये काँग्रेस आणि भाजपला जनतेनं नाकारलं आणि तिसर्‍या पर्यायाला निवडलंय. त्यामुळे जनतेचा कौल स्वीकारून पुढच्या वाटचालीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं,

दरम्यान, यूपीए 2 चं सरकार अनेक आघाड्यांवर ठरलं. त्याचा फायदा भाजपनं पुरेपूर उचलला. निवडणूक काळात काँग्रेस कमकुवत झाली होती. ती भाजपनं आरोपांना उत्तरं देऊ शकली नाही, असा हल्ला प्रफुल्ल पटेलांनी केला. काँग्रेसनं कधी पवारांचा सल्लाही घेतला नसल्याचं ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ulhas

    प्रसार माध्यमांनी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल बातम्या दाखवण्यात/छापण्यात आपला अमुल्य वेळ वाया घालवू नये. त्यांना करू दे जे करायचे ते. तो भूत काळ आहे आणि नरेंद्र भाई मोदी भविष्य काळ. भाजप शासित भागांमधील सामान्य जनतेचे प्रश्न लोकांसमोर मांडा आता. निवडून आलेल्या खासदारांना प्रश्न विचारावेत / दर महिन्याला एखादी समस्या सोडवण्यासाठी काय पाउले उचलली/किती टक्के यश लाभलं? पुढील महिन्यासाठी काय action item आहे, इत्यादी बरंच काही काही करता येईल माध्यमांना.सामान्य जनतेचे प्रश्नं कसे सुटतील हे पहावं!

close