‘आप’ला धक्का, शाझिया इल्मी पक्षातून बाहेर

May 24, 2014 2:45 PM0 commentsViews: 1534

33shazia24 मे : आम आदमी पक्षामध्ये आता लोकशाही राहिली नाही, पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेत नाही, बेल आणि जेलमध्ये वेळ वाया घालवत असून पक्ष दिशाहीन झाला असून भरकटला आहे अशी जळजळीत टीका करत शाझिया इल्मी यांना आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. इल्मींसोबत कॅप्टन गोपीनाथ ही पक्षातून बाहेर पडले आहे. शाझिया इल्मी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. यावेळी शाझिया इल्मी यांनी ‘आप’वर सडकून टीका केली.

हिंद स्वराजच्या गप्पा मारणारा पक्ष मुळात तसा राहिलेला नाही. लोकांचाही ‘आप’वरचा विश्वास उडत चालला आहे कोणतेही ध्येय धोरण नसल्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं शाझियांनी स्पष्ट केलं. आपकडून खूप चुका झाल्या आहेत हे मान्य करावं लागेल. उठसूठ आप सतत काही कॉर्पोरेट कंपन्यांनाच टार्गेट करते. मुळात याची गरजच नाही. पक्षाच्या अशा कामामुळे अनेक आमदार नाराज आहे अशी माहितीही शाझिया यांनी दिली. तसंच अब्रुनुकसानी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी जामीन घ्यायला हवा होता. बेल आणि जेलमध्येच वेळ वाया जात आहे अशी बोचरी टीकाही शाझिया यांनी केली.

तसंच मला जर योग्य जबाबदारी दिली तर आम आदमी पक्षात परत प्रवेश करेन असंही त्यांनी सांगितलं. आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून शाझिया सहभागी होत्या. दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या वेळी जागावाटपावरुन शाजिया यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारला होता. आपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी अशी शाजियांची इच्छा होती पण आपने ती नाकारली त्यामुळे शाजिया दुखावल्या गेल्या. एवढंच नाहीतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी शाजियांना दिल्लीतून लढायचं होतं पण त्यांना गाझियाबाद मतदारसंघ देण्यात आला आणि तिथे त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्या आणखी नाराज झाल्या. लोकसभेत आपचा दारुण पराभव झाल्यामुळे नाराज झालेल्या शाझिया पक्षातून बाहेर पडल्या आहे. शाझिया यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांची समजूत घालण्याचा पूर्ण प्रयत्न झाला पण यात अपयश आलं अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close