मोहन राऊत हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आ.कथोरेंसह सहा जणांवर गुन्हे दाखल

May 24, 2014 8:06 PM0 commentsViews: 1633

444badlapur_mohan_raut24 मे : बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्ये प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांच्या फिर्यादीनुसार बदलापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग आल्याची चिन्ह निर्माण झालीय.

शुक्रवारी 23 मे रोजी सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी मोहन राऊत यांची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे बदलापुरात खळबळ उडाली. या हत्येचा निषेध म्हणून बदलापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मारेकर्‍यांच्या शोधात पोलिसांनी पाच पथके विविध ठिकाणी रवाना केले आहे.

मोहन राऊत आणि आमदार कथोरे यांचे राजकीय आणि वैयक्तिक संबंध कसे होते याचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान, बदलापुरात घडलेल्या हत्येचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलापुरात ठाण मांडून आहेत. शहरात दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे शहरउपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता तर त्याच्या एक दिवसाआधी पप्पू बागूल या गुंडाने होळीच्या दिवशी संतोष साळवी या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर एका वर्षापूर्वी भाजपचे नेते शरद म्हात्रे यांच्यावर सुद्धा गोळीबार करण्यात आला होता त्यामुळे शहरात गोळीबाराची चौथी घटना आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close