पंतप्रधानांनी घेतला भाजपच्या आरोपांचा समाचार

April 13, 2009 12:43 PM0 commentsViews: 2

13 एप्रिल, मुंबई लोहपुरूष अडवाणी कंदाहारमध्ये का वितळले, असा सवाल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज मुंबईत ग्रॅन्ड हयातमध्ये भरलेल्या पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान मनमामोहनसिंग एका कार्यक्रमानिमित्त मुंबई दौ-यावर आले होते. पंतप्रधानाच्या बायपास सर्जरीनंतरचा त्यांचा तो पहिलाच मुंबई दौरा होता. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. ' कंदाहार प्रकरणामध्ये अतिरेक्यांसमोर भाजपनं हात टेकले होते. त्यामुळेस्वत:अतिरेक्यांसमोर हार मानणा-या अडवाणींनी आघाडी सरकारवर टीका करणं हास्यास्पद आहे, असा टोला मनमोहनसिंगांनी पत्रकार परिषदेत मारला. भाजपच्या टीकेला मनमोहन सिंग यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. माझं काम हीच माझी ओळख आहे. मी मोठ्याने बोलत नाही, आरडाओरडा करत नाही म्हणजे मी कमजोर आहे, असा त्याचा अर्थ नाही, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ' माझ्या कारकीर्दीवरून माझं व्यक्तिमत्त्व पारखा, माझ्या वक्तृत्त्वावरून नव्हे, असंही पंतप्रधान मनमोहन सिंग त्यावेळी म्हणाले. ' राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान होण्याचे सगळे गुण आहेत. तरूणांना राजकारणात येण्याची भरपूर संधी आहे आणि आम्ही ती देणार, असं आश्वासनही त्यांनी दिलं. या पत्रकारपरिषदेत पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. सत्यमसारखं प्रकरण पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली असल्याचंही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं. अफझल गुरूच्या फाशीचा निर्णय कायद्यानुसारच होणार आहे. अफझलच्या दया अर्जा आधी 21 अर्जांवर निर्णय व्हायचा आहे, असंही पंतप्रधानांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. ' न्याय मिळण्यास होणा-या विलंबामुळे अनेकदा लोकांचा संयम सुटतो, आणि दंगली घडतात. पण लोकांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी न्याययंत्रणेला गती देण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.दहशतवादाला धैर्याने सामोरं जाणा-या मुंबईकरांचं कौतुकही या पत्रकार परिषदेत मनमोहनसिंग यांनी केलं. मुंबईच्या धैर्याला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलाम केला. मुंबईला आम्हाला जागतिक शहर बनवायचंय, असं वचनही पंतप्रधानांनी दिलं. त्यावेळी काँग्रेस सरकारनं केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. आम्ही नवीन महाविद्यालयं उभारणार आहोत आणि त्याचा फायदा प्रत्येकाला होणार आहे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न आहोत येत्या काळात आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासनही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं आहे.

close