क्रुझमुळे पर्यटकांना घडवणार मालवण-गोवा समुद्रसफर

April 13, 2009 2:18 PM0 commentsViews: 169

13 एप्रिल, मालवण समीर म्हाडगुतकोकणाच्या पर्यटन व्यवसायातली संधी ओळखून मालवणमधल्या एका मत्स्य-उद्योजकानं तीन मजली बोट तयार केली आहे. त्या मस्त्यउद्योजकाचं नाव आहे राजन सरमळकर. क्रुझसारख्या दिसणा-या राजन सरमळकर त्यांच्या तीन मजली बोटीतून मालवण ते गोवा अशी समुद्र पर्यटन सफर काही दिवसांतच सुरू करणार आहेत. रेस्तराँ, एसी-नॉन एसी डीलक्स रूम्स ,डान्स फ्लोअर अशा सगळ्या सोयी या क्रूझवर आहेत. मासेमारी व्यवसायातल्या मालवणच्या राजन सरमळकरांनी स्थानिक कारागिरांच्या मदतीने तयार केलेली ही अशा प्रकारची कोकणातली पहिलीच बोट आहे. ' पर्यटनाच्या दृष्टीने आम्हा सिंधुदुर्गवासियांना कसा फायदा होईल याचा विचार करत असताना माझ्या मनात बोटीवर क्रुझ तयार करण्याची कल्पना सुचली, ' असं राजन सरमळकर म्हणाले. राजन सरमळकर आणि त्यांच्या कारागिरांना क्रुझ तयार करायला 27 महिने लागले. उंडील जातीचं लाकूड क्रुझ बनवण्यासाठी वापरण्यात आलं आहे. आत्तापर्यंत जवळपास तीन कोटीचा खर्च झालाय. आणि तिला समुद्रात लोटायला तीनशे मजूर लागणार आहेत. गेल्या अकरा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास दहा टक्क्के पण झालेला नाही. त्यामुळे आता तरी अशा धाडसी उपक्रमांच्या आड सरकारच्या जाचक अटी येता कामा नयेत अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. चारशे माणसांची क्षमता असलेल्या या बोटीला, सुरुवातीला फक्त दोनशे जणांसाठीच परवानगी मिळाली आहे. पर्यटकांना तर आत्तापासूनच या बोटीचं आकर्षण वाटू लागलं आहे. बॅनर्स, पोस्टर्स, एसएमएस आणि वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवार जसा त्यांचा प्रचार करतात तशा प्रकारे माध्यमांचा वापर करून पर्यटनासाठीच्या नवनवीन उपक्रमांचाही हायटेक प्रचार करायला हवा, असं राजन सरमळकरांची बोट पाहायला येणा-या पर्यटकांचं म्हणणं आहे. सुरुवातीचे काही महिने ही बोट तारकर्ली खाडीतून पर्यटन सफ़र घडवणार आहे. त्यामुळे डॉल्फीन आणि स्नॉर्कलिंगचा आनंदही पर्यटकांना घेता येणारेय.

close