पारोळ्यात मृतांची संख्या 26 वर : कोष्टी गल्लीत पसरली स्मशान शांतता

April 13, 2009 3:12 PM0 commentsViews: 92

13 एप्रिल, पारोळा प्रशांत बागपारोळ्यात सावित्री फायर वर्कच्या फटाक्यांच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीतील मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. काल एका महिलेचा मृतदेह राखेच्या ढिगार्‍याखाली सापडला तर आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडलेत. या ढिगार्‍याखाली आणखीही काही मृतदेह सापडण्याची शक्यता असल्यानं, ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.जळगावमधल्या फटाका कारखान्यातल्या स्फोटामुळं अनेकांची कायमची वाताहत झाली आहे. कोणाची बायको तर कोणाचा मुलगा तर कोणाचा नवरा या स्फोटांत गेलाय. या गावातल्या कोष्टी गल्लीतलं चित्र अक्षरश: मन हेलावणारं होतं. कारण या एकांच गल्लीतल्या सात जणांचे बळी या स्फोटानं घेतलेत. मंगलदास कोष्टींच्या घरी तर काळीज फाडणारा आक्रोश होता. कारखान्यातल्या स्फोटामध्ये त्यांची दोन मुलं मृत्युमुखी पडली. कारखान्यात काम करण्यासाठी घरातून चौघंजणं निघाले पण परतले फक्त दोघचं.कोष्टी गल्लीत गेल्या तीन दिवसांपासून स्मशान शांतता पसरली आहे. आता ऐकायला येतायेत फक्त हुंदके. घटना घडली, आता चौकशी कमिशन जाहीर झाली आहे. सरकारनं मदतीचं वाटपही सुरू केलं आहे. हे सगळंच होणार पण ज्या आईच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलांचा मृत्यू झालाय तिची पोकळी भरणार कशी? ह्याचं उत्तर कोणाकडेचं नाहिये.

close