शरीफही म्हणाले, ‘अच्छे दिन आएंगे’!

May 27, 2014 6:32 PM0 commentsViews: 5575

3modi_sarif_meet27 मे : देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सकाळी पदभार स्वीकारला. मोदींनी आज पंतप्रधान म्हणून कामाला सुरुवात केली. शेजारील राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी कामाची शुभारंभ मैत्रीने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची दुपारी भेट घेतली. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये ही भेट झाली. शरीफ यांनी सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलंय.

दोन्ही देशांमधलं अविश्वासाचं वातावरण निवळायला हवं, असं पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. दोन्ही देशांच्या विकासासाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. या भेटीत मोदींनी सीमेपलिकडच्या दहशतवादाच्या मुद्दयावर भर दिला. 26/11 हल्ल्याच्या खटल्याचा तपास अधिक जलदगतीने व्हावा, हे सर्वात महत्त्वाचे असल्याचं मोदींनी म्हटलं.

मोदी-शरीफ यांच्या भेटीत दहशतवादावर चर्चा झाल्याचं कळतंय. भारताने दहशतवादाविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. तसंच लष्कर ए तोयब्बाचा म्होरक्या हाफीज सय्यद आणि दाऊद इब्राहिम यांच्याबद्दलही चर्चा झाल्याचं कळतंय. दोन्ही पंतप्रधानांमध्ये जवळपास 45 मिनिटं ही चर्चा सुरू झाली. शरीफ यांनी यावेळी समझोता स्फोटाचा मुद्दा उपस्थित केला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेली चर्चाही महत्वाची मानली जात आहे. गेले 2 वर्षं भारत-पाकिस्तान सीमेवर चकमकी सुरू असल्यामुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेले होते.

मात्र, नरेंद्र मोदींनी शपथविधीसाठी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही आमंत्रण दिलं. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. शरीफ- मोदी भेटीच्या वेळेस परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जाहीर झालेल्या सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. पाकच्या मीडियानेही दोन्ही देशातील या भेटीवर चांगले संकेत समजले आहे. मोदींना भेटण्याअगोदर शरीफ जामा मशीद येथे पोहचले होते. त्याअगोदर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली होती.

दरम्यान, मोदींनी आज सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांची भेट घेतली. आज सकाळी साडेनऊ वाजता अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी मोदींनी हेरातमध्ये झालेल्या भारतीय दूतावासावर हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. करझाई यांनी या हल्ल्या अगोदर लष्कर ए तोयबाने इशारा दिला होता असं सांगितलं.

यावर भारताने चिंता व्यक्त केलीय. तर त्यानंतर 10 च्या सुमारास मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांची मोदींनी भेट घेतली. साडे दहा वाजेच्या सुमारास श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षेंचीही मोदींनी भेट घेतली. यावेळी भारत आणि श्रीलंकेतल्या परस्परसंबंधांवर पंतप्रधानांनी भर दिला. तसंच मच्छिमारांसंदर्भातही चर्चा झाल्याचं कळतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close