उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी पेन स्पाय कॅमेरा

April 14, 2009 11:36 AM0 commentsViews: 16

14 एप्रिल, मुंबईउदय जाधवछुप्या कॅमेर्‍यांचा वापर डिटेक्टीव्ह एजन्सी आणि सिक्युरिटी एजन्सी करतात, हे आपल्याला माहीत आहे. छुपे कॅमेरे नावाप्रमाणेच छुपे असतात. छुप्या कॅमर्‍यांचा विषय निघण्याचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका. कारण निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारही डिटेक्टीव्हगिरी करू लागले आहेत.आपले मतदार आणि कार्यकर्त्यांवर कडी नजर ठेवण्यासाठी उमेदवारांनी पेनमधला स्पाय कॅमेरा जवळ ठेवायला सुरुवात केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळ जवळ 200 पेन स्पाय कॅमेर्‍यांची विक्री झाली आहे. बाजारात समर्थ सिक्युरिटीचे संचालक यशवंत पाटील यांनी तो कोरियन स्पाय कॅमेरा बाजारात आणला आहे. स्पाय कॅमेर्‍यांविषयी यशवंत पाटील सांगतात, " आमच्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी हटके हवं असतं.त्यांना कोणाच्या चटकन् लक्षात न येणारी सुरक्षा हवी असते. त्यामुळे आम्ही हा पेनमधला स्पाय कॅमेरा बाजारात आणला." सुरक्षेसाठी हायटेक मशीन पुरवणारे अशी यशवंत पाटील यांची ख्याती आहे. ते गेली सतरा वर्षं या व्यावसायात आहेत. सध्या त्यांच्याकडे नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ती पेनमध्ये असलेल्या छुप्या कॅमेर्‍याची. कोरियात बनत असलेल्या या पेनाची किंमत चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. छुपा कॅमेरा असलेल्या या पेनामध्ये पाच तासांचं सलग रेकॉर्डिंग करता येतं. आता याच छुप्या कॅमेर्‍याने उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डावपेज समजण्यासाठी वापर करणार आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्वच पक्ष छुप्या कॅमेर्‍याचा वापर करतायेत. त्यामुळे मीडियाच्या कॅमेर्‍यासमोर बोलण्यास कोणीही तयार नाही. पण पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा लोकांची कामं केली तर छुप्या कॅमेर्‍यांची गरज भासणार नाही.

close